उसाऐवजी वधारला पवारांचा भाव !
By admin | Published: February 16, 2015 04:09 AM2015-02-16T04:09:46+5:302015-02-16T04:09:46+5:30
मोदी अखेर बारामतीत येऊन गेले. बारामतीची ‘मती’ त्यांना विशेष भावल्याने धनगरांऐवजी शरद पवारांचे सत्तेतील आरक्षण त्यांनी या दौ-यातून पक्के केले की काय,
सुधीर लंके, पुणे
मोदी अखेर बारामतीत येऊन गेले. बारामतीची ‘मती’ त्यांना विशेष भावल्याने धनगरांऐवजी शरद पवारांचे सत्तेतील आरक्षण त्यांनी या दौ-यातून पक्के केले की काय, असा या भेटीचा अन्वयार्थ निघू लागला आहे. मोदींनी ऊसदराचा प्रश्न अनुत्तरित ठेवला. पण पवार यांचा राजकीय ‘भाव’ मात्र या दौ-याने वधारला. भाजपाला आणि त्यांच्याशी संसार करणा-या शिवसेनेलाही हा नवा ‘व्हॅलेंटाइन’ मानवणारा नाही. त्यांना या व्हॅलेंटाइनला काळे झेंडे दाखविता आले नाहीत एवढेच!
पंतप्रधान म्हणून मोदींनी बारामतीत येऊन एखाद्या शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावणे यात वादग्रस्त व आश्चर्यकारक असे काहीच नाही. पण या कार्यक्रमाचा हेतू ‘शासकीय’ अन् सरळसोट होता, असे मानायला कुणीच तयार नाही. पंतप्रधान म्हणून मला आता वेगवेगळ्या संस्थांचे व नेत्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागणार, ही गरज मोदींनी कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवली. मुद्दा मोदींचा नाहीच, मुद्दा आहे पवारांचा. त्यांनी मोदींना मिठ्ठ्या मारायला सुरुवात का केली, याबाबत शंका घेतली जात आहे. पवारांचे राजकारण हे धक्कातंत्राचे राजकारण म्हणून ओळखले गेले आहे. ते स्वत:ला यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार मानतात. यशवंतरावांनी बारामतीच्या कृषी संशोधन केंद्रात १९७५ साली एक आंब्याचे झाड लावले होते. यशवंतरावांच्या राजकारणाला जी फळे आली, त्यापैकी शरद पवार हे एक आहेत. या आंब्याच्या झाडाशेजारीच काल मोदींच्या सभेचा मांडव पडला, हे बारामतीकरांसाठी व राज्यासाठीही नवीन आहे. ‘मोदी-पवार’ यांच्यातील विचारधारेचा संघर्ष ही आता बारामतीकरांना नुरा कुस्ती वाटू लागली आहे.
शेतकरी नेता व सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता ही आपली प्रतिमा गडद करण्यासाठी पवारांनी नाही म्हणून मोदींसमोर ऊस, दूध आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला. यातून त्यांनी मोदींची काहीशी
कोंडी करीत आपले राजकारणच साधले. कारण या प्रश्नांबाबत मोदींनी काही
घोषणा करणे अथवा मौन बाळगणे हे दोन्हीही पवारांच्या पथ्यावरच पडणारे होते. भाजपाने हे प्रश्न न सोडविल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच मिळणार.