राज यांना आघाडीत घेण्याचे पवारांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:13 AM2019-05-02T05:13:47+5:302019-05-02T05:14:10+5:30
राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल
मुंबई : राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत सामील करून घेण्याबाबतचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरेंशी याबाबत चर्चा झालेली नाही, असेही पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज यांच्या सभांची जोरदार चर्चा होती. ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली होती. या पर्श्वभूमीवर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे राज्यातील सरकार घालविण्यासाठी जी समीकरणे जुळवावी लागतील, त्याचा विचार केला जाईल. बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. त्यांचे प्रतिबिंब राज ठाकरेंमध्ये दिसत आहे.
भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र आपली भूमिका बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे पवार म्हणाले.
तर, राज ठाकरे यांच्या सभांचा भाजपलाच फायदा झाल्याचा दावा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. मोदी परत सत्तेवर आले पाहिजेत म्हणून मतदानाला आल्याचे लोक बोलत होते, असे तावडे म्हणाले.