राष्ट्रवादीतील पडझडीवर पवारांची ‘सर्जरी’

By admin | Published: January 28, 2017 10:56 PM2017-01-28T22:56:28+5:302017-01-28T22:56:28+5:30

नेत्यांचे कान उपटले : आघाड्यांबाबत मूक संमती, पण पक्षाच्या चौकटीत राहण्याचा कानमंत्र

Pawar's 'surgery' on NCP's fallacy | राष्ट्रवादीतील पडझडीवर पवारांची ‘सर्जरी’

राष्ट्रवादीतील पडझडीवर पवारांची ‘सर्जरी’

Next

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेले दोन महिने सुरू असलेल्या पडझडीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांत ‘सर्जरी’ करण्याचा प्रयत्न केला. नेत्यांनी आपल्या राजकीय सोयीसाठी केलेल्या आघाड्यांना मूक संमती देत नेत्यांची कानउपटणी केली, पण पक्षाच्या चौकटीत राहूनच काम करण्याचा कानमंत्रही देण्यास ते विसरले नाहीत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जात होते. पाच आमदार, दोन खासदारांसह जिल्ह्यातील प्रमुख सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादीची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आहे. त्यात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला. नगरपालिकेपासून पक्षातील दिग्गज भाजपमध्ये दाखल झाले असून, पक्षाला सध्या केवळ पोकळ सूज आलेली आहे. त्यात कमी की काय म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसाठी थेट भाजपशी आघाडी केली. पक्षातील चारही नेत्यांची चार दिशेला तोंडे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. नेत्यांनी घेतलेल्या सोयीच्या भूमिकेचा अहवाल यापूर्वीच प्रदेश राष्ट्रवादीसह पवार यांच्याकडे गेलेला आहे. अशा परिस्थितीत पक्षाध्यक्ष पवार यांचा दौरा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या तोंडावर पवार यांचा दौरा म्हणजे काहीतरी उलथापालथ ठरलेली असते, पण यावेळी त्यांचा पक्षांतर्गत कुरघोड्या मिटवण्यातच वेळ गेल्याने इतर जोडण्या लावता आल्या नाहीत.
पक्षाच्या विस्कटलेल्या घडीवर त्यांनी जाहीर कार्यक्रमातही बोट ठेवले. ‘केपीसी’ हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सतेज पाटील यांनी उत्कृष्ट सर्जरी केल्याचे सांगत हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांना प्रकृतीकडे लक्ष द्या, धनंजय महाडिक यांच्यासारखे राहा, असा सल्ला देऊन पवार यांनी मुश्रीफ, महाडिकांचे कान उपटले. आघाड्यांच्या मांडवलीत गोंधळलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चौकटीत राहून काम करण्याचा सल्लाही देण्यास ते विसरले नाहीत.
शुक्रवारी रात्रीही त्यांनी जिल्ह्यातील काही ‘विश्वासू’ नेत्यांशी चर्चा करून शनिवारी सकाळी निवेदिता माने, संध्यादेवी कुपेकर, धनंजय महाडिक, के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना बोलावून वादावर ‘सर्जरी’ केली.
या सर्जरीचा ‘इफेक्ट’ लगेच दिसणार नसला तरी भविष्यात राष्ट्रवादीची जिल्ह्यातील घडी बसविण्यासाठी निश्चित उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. (प्रतिनिधी)


चव्हाट्यावरील वादाने पवार संतप्त
भिमा कृषी प्रदर्शनावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांच्याशी आपले राजकीय मतभेद असल्याचे जाहीर कबूल केले. महाडिक यांच्या व्यासपीठावर जाऊन पक्षाध्यक्षांच्या समोरच तेही ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतभेद उघड झाल्याने शरद पवार कमालीचे संतप्त झाल्याचे समजते.
जयंतरावांवर दुरुस्तीची जबाबदारी
राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक असे सरळ गट कार्यरत आहेत. दोन्ही गटांची वेगवेगळी भूमिका असल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. ही परिस्थिती दुरुस्त करण्याची जबाबदारी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर सोपविल्याचे समजते. यासाठी जाहीर कार्यक्रमांचे निमंत्रण नसतानाही ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पवार यांच्यासोबत होते.


जांभळेंना अभय
इचलकरंजी नगरपालिकेत भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा देणारे माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्यावर कारवाई करावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे प्रयत्न सुरू केले होते. याबाबत शनिवारी निवेदिता माने व जांभळे यांनी पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कॉँग्रेसला विरोध केला म्हणून कारवाई करणे योग्य नसल्याचे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना फोन करून कारवाई न करण्यास सांगितले.

माने गटाचे पवारांकडे स्पष्टीकरण !
जिल्हा परिषद निवडणुकीत माने गटाने भाजपशी साधलेल्या संधानाबद्दल तक्रार झाली होती. कॉँग्रेससोबत ‘स्वाभिमानी’ जात असेल तर आमच्या अस्तित्वासाठी भाजपसोबत जाणे गरजेचे होते. त्यात पक्ष निरीक्षकांनी आघाड्या करणार असाल, तर पक्षाचे चिन्ह वापरू नका, असे सांगितल्याचे निवेदिता माने यांनी पवार यांना सांगितले.

Web Title: Pawar's 'surgery' on NCP's fallacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.