पंतप्रधानपदाच्या 'त्या' विधानावर पवारांचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 10:33 AM2019-04-29T10:33:44+5:302019-04-29T10:34:41+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं आहे.
मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं आहे. मतदानानंतर मोदींनी काल केलेल्या पंतप्रधानपदाच्या विधानावर भाष्य केलं आहे. त्यावेळी पवारांनी राहुल गांधींऐवजी पंतप्रधानपदासाठी ममता, मायावती आणि चंद्राबाबूंची नावं पुढे केली होती. त्याच विधानावर पवारांनी आता यू-टर्न घेतला आहे. अशी बातमी छापणं म्हणजे एक प्रकारचा खोडसाळपणाच आहे. फक्त टीआरपीसाठी अशी बातमी छापून आणल्याचा आरोपही पवारांनी प्रसारमाध्यमांवर केला आहे.
पवार म्हणाले, आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा असून, देशात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. मुंबईतल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत काळजी वाटत असली तरी मुंबईकर उत्साहानं मतदानाचा हक्क बजावतील. माझ्यासाठी मावळ काय, बारातमी काय आणि मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मतदान करण्याची संधी मला मिळाल्यानं मी आनंदी आहे, सुट्ट्या आहेत लोक बाहेर गेले आहेत असं म्हणतात. पण मला असं वाटतं मुंबईकर मतदानात मागे राहणार नाहीत. यंदा लोक निर्णायक निर्णय घेतली, असंही पवार म्हणाले आहेत.
काल पवारांनी एका टीव्ही चॅनेलनं दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदावर भाष्य केलं होतं. पवारांनी पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्या नावांना समर्थन दिलं होतं. जर राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आल्यास हे तीन नेते पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात. या तिन्ही नेत्यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्याचाही उल्लेख पवारांनी केला होता.