पवारांच्या नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामुळे इतर नेतेही खडबडून जागे !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 05:19 PM2019-11-01T17:19:56+5:302019-11-01T17:20:05+5:30
पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जात असल्यामुळे इतर नेत्यांना देखील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. किंबहुना अनेक नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
मुंबई - राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून निसटला आहे. सोयाबीन, द्राक्ष, कपाशी अशा अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. त्यातच निवडणूका पार पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचं कुणाला सोयीरसुतक दिसत नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणीसाठी घराबाहेर पडले आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांसह प्रशासकीय यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे.
शरद पवार यांनी वयाच्या 80व्या वर्षी विधानसभा निवडणूक गाजवली. मात्र जनतेने आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा निकाल दिला. तो निकाल मान्य करत पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. याआधी अनेकांना राज्यात विरोधी पक्षच नसल्याची टीका केली होती. परंतु, यावेळी विरोधकांमध्ये बळ भरण्यासाठी खुद्द शरद पवार बाहेर पडले आहे.
दरम्यान पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जात असल्यामुळे इतर नेत्यांना देखील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. किंबहुना अनेक नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
याचीच दखल सरकारने देखील घेतली आहे. ओल्या दुष्काळावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीचा पंचनामा झाला नसेल तरी काळजी करू नका, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विम्यासाठी सरकारी पंचनामे ग्राह्य धरण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एकूणच पवारांच्या दौऱ्यामुळे सर्व नेत्यांसह प्रशासन देखील जागे झाले आहे.