सावकाराने पाजले शेतकऱ्याला विष

By admin | Published: March 6, 2016 03:41 AM2016-03-06T03:41:27+5:302016-03-06T03:41:27+5:30

आपल्याविरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका सावकाराने शेतकऱ्याला विष पाजल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातील देवीबाभूळगाव येथे शुक्रवारी रात्री घडला.

Pawn farmer poison | सावकाराने पाजले शेतकऱ्याला विष

सावकाराने पाजले शेतकऱ्याला विष

Next

बीड/चौसाळा : आपल्याविरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका सावकाराने शेतकऱ्याला विष पाजल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातील देवीबाभूळगाव येथे शुक्रवारी रात्री घडला. अत्यवस्थ शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सावकारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रामदास धोंडीबा जोगदंड यांचे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, ३ मुले असे कुटुंब आहे. सहा एकर शेतीवर त्यांची गुजराण आहे. जोगदंड हे शुक्रवारी रात्री जेवण करुन घराबाहेर मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. तेव्हा सावकार भारत शिंदेसह आठ जण तेथे जीपमधून आले. त्यांनी आमच्याविरुद्ध तक्रारी करतो का, असे म्हणत त्यांना जीपमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला. रामदास यांनी त्यांच्याशी झटापट केली. त्यानंतर एकाने सोबतचे विषारी द्रव रामदास यांच्या तोंडात ओतले. त्यांना तेथे सोडून नऊही जण जीपमधून फरार झाले.
रामदास यांच्या मित्रांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तीन महिन्यांपासून सावकाराने स्वत:च्या नावे केलेली आपली जमीन परत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत मी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे भारत शिंदे याच्यासह इतर नऊ जणांनी मला विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न केला, असा जवाब जोगदंड यांनी दिला आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश चव्हाण यांनी सांगितले. शनिवारी सकाळी आ. विनायक मेटे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जोगदंड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
१९९७ मध्ये बहिणीच्या विवाहासाठी जोगदंड यांनी शिंदे याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.
सावकाराने त्यांची चार एकर १५ गुंठे जमीन नावावर करुन घेतली होती. २००४ मध्ये एक लाख रुपये कर्जाचे सव्याज दोन लाख रुपये रामदास
यांनी परत केले. मात्र, त्यानंतरही सावकाराने नावावर करुन घेतलेली जमीन त्यांना पुन्हा परत करण्यास नकार दिला होता.
रामदास यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधकांकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाने भारत, भीमराव व कमलाकर शिंदे यांच्याविरुद्ध नेकनूर ठाण्यात अवैध सावकारकीचा गुन्हा नोंद केला होता. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pawn farmer poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.