डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे करही भरा
By admin | Published: September 18, 2016 04:16 AM2016-09-18T04:16:22+5:302016-09-18T04:16:22+5:30
पालिकेच्या विभाग कार्यालयात गर्दीमध्ये तासंतास उभे राहण्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.
शेफाली परब-पंडित,
मुंबई- पाणीपट्टी, मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात गर्दीमध्ये तासंतास उभे राहण्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. हायटेकच्या युगात ही सेवादेखील आधुनिक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे करदात्यांना हे कर आपल्या वेळेत व आपल्या सोयीनुसार भरता येणार आहेत.
आजच्या घडीला नागरिकांना महापालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये नागरी सुविधा केंद्रात जाऊन पाणीपट्टी, मालमत्ता कर भरावा लागत आहे. बिल भरण्यासाठी नागरिकांना सुट्टीच्या दिवशी अथवा सुट्टी काढून जावे लागते. त्यातही अनेकवेळा या केंद्रांवर प्रचंड गर्दी असल्याने नागरिकांची प्रतीक्षा वाढते. यामुळे त्यांची सुट्टी आणि वेळ दोन्ही वाया जातात. तसेच सुट्ट्या पैशांवरून नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडतात. पालिकेच्या शाळा, रुग्णालय इतकेच नव्हेतर, पालिकेचा कारभारही हायटेक झाला आहे. त्यामुळे ही सेवाही हायटेक करण्याची काँग्रेस नगरसेवक परमिंदर भमरा यांच्या ठरवाची सूचना पालिकेच्या महासभेत मंजूर झाली होती. ही मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. चाचणी घेऊनच ही नवीन योजना अंमलात येणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.