पतीचे कर्ज फेडणे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही
By admin | Published: November 22, 2015 02:18 AM2015-11-22T02:18:20+5:302015-11-22T02:18:20+5:30
पती-पत्नीने जबाबदारी उचलत एकमेकांचे कर्ज फेडणे, ही क्रूरता असू शकत नाही. त्यातच जर पत्नी पतीचे कर्ज स्वखुशीने फेडत असेल, तर हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही, असे
- दीप्ती देशमुख, मुंबई
पती-पत्नीने जबाबदारी उचलत एकमेकांचे कर्ज फेडणे, ही क्रूरता असू शकत नाही. त्यातच जर पत्नी पतीचे कर्ज स्वखुशीने फेडत असेल, तर हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने पती एटीएमप्रमाणे वापर करत असल्याचा आरोप करणाऱ्या पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिला.
एकमेकांना सहकार्य करणे व समाजाने घातलेली बंधने निभावणे, हे पती-पत्नीचे वैवाहिक कर्तव्य आहे. जर पत्नी पतीचे कर्ज फेडण्यास मदत करत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि त्यातच जर पत्नी स्वखुशीने पतीचे कर्ज फेडण्यासाठी हातभार लावत असेल तर ती क्रूरता म्हणता येणार नाही, असे निरीक्षण कुटुंब न्यायालयाने नोंदवत कुवैतमध्ये राहून दरमहा १ लाख रुपये कमावणाऱ्या महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.
दिव्या पांचाळ (बदललेले नाव) आणि ओम्कार पांचाळ (बदललेले नाव) यांचा विवाह २५ फेब्रुवारी २०११ रोजी झाला. विवाहानंतर काहीच दिवसांत दोघेही कामानिमित्त कुवैतला राहण्यासाठी गेले. तेथे दिव्याला दरमहा १ लाख रुपये तर ओम्कारला दरमहा १ लाख ८० हजार रुपये वेतन मिळत होते. दिव्या यांनी घटस्फोटासाठी केलेल्या अर्जानुसार, ओम्कार त्याचा आणि दिव्याचा पगार भारतात वडिलांना पाठवत असे. हा पैसा ओम्कारच्या वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जायचा. दिव्याने कर्ज फेडण्यासाठी सुमारे १४ लाख रुपयांची मदत ओम्कारला केली. मात्र सर्व कर्ज फेडल्यानंतर ओम्कारने दिव्याला आॅस्ट्रेलियात कायमस्वरूपी राहण्यासाठी आग्रह धरला. मात्र दिव्याने त्यास नकार देत कुवैतला राहण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ओम्कारने भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. दिव्यालाही भारतात येण्यास भाग पाडले. घाटकोपरला आल्यानंतर ओम्कार दिव्याला टाळू लागला. तिच्यापासून दूर जाऊ लागला. एक दिवस त्याने दिव्याला तडजोड करून घटस्फोट देण्यास सांगितले. त्यानंतर ओम्कार अहमदनगर व अन्य ठिकाणी जाऊन राहू लागला. आता ओम्कारला दुप्पट पगाराची नोकरी लागली आहे आणि दिव्याला वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपये असलेली नोकरी नाइलाजाने करावी लागत आहे, असेही घटस्फोट अर्जात म्हटले आहे. ओम्कारने कर्ज फिटेपर्यंत आपला एटीएम मशीनसारखा वापर केला. कर्ज फिटल्यानंतर तो आपल्याशी अत्यंत क्रूरतेने वागला. त्यामुळे ओम्कारला कर्ज फेडण्यासाठी दिलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत आणि त्याच्यापासून घटस्फोट द्यावा, अशी मागणी दिव्याने घटस्फोट अर्जात केली आहे.
ही सुनावणी एकतर्फी झाली. ओम्कारने या याचिकेवर उत्तर दिलेच नाही. मात्र कुुटुंब न्यायालयाने दिव्याचे आरोप फेटाळले. ‘याचिकाकर्तीने केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, असे म्हणत न्यायालयाने आरोप फेटाळले. पती - पत्नीने एकमेकांचे कर्ज फेडणे म्हणजे क्रूरता नाही. पत्नी हे कर्ज स्वखुशीने फेडत असेल, तर हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही,’ असे न्यायालय म्हणाले.
रक्कम परताव्याचे निर्देश देण्यास नकार
पती-पत्नी एकत्र राहत असताना पत्नीने पतीला काही आर्थिक साहाय्य केले तर ते वैवाहिक कर्तव्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कुटुंब न्यायालयाने दिव्याला तिच्या पतीपासून घटस्फोट देण्यास व तिने ओम्कारला दिलेले १४ लाख रुपये परत देण्याचे निर्देश देण्यासही नकार दिला.