अभियांत्रिकीच्या प्राचार्यांवर वेतनाची खैरात
By admin | Published: December 23, 2015 02:03 AM2015-12-23T02:03:27+5:302015-12-23T02:03:27+5:30
राज्यातील अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर उधळपट्टी सुरू असल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आली असून शिक्षणमंत्री
नागपूर : राज्यातील अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर उधळपट्टी सुरू असल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आली असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण शुल्क समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईतील खारघरच्या महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले. तेथील उपप्राचार्यांना कुलगुरुंपेक्षाही अधिक वेतन दिले जाते. विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमित वेतनश्रेणीचे हे उल्लंघन आहे. प्राचार्यांचे वेतन सहसा दीड लाखांच्या पुढे जात नाही. मात्र खारघरच्या प्रकरणात प्राचार्यांना तब्बल चार लाखांचे वेतन दिले जात आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ प्राध्यापकाचे मूळ वेतन मर्यादा ६५ हजार आहे. खर्चावर आधारित शुल्क या तत्वानुसार शिक्षण शुल्क समिती खासगी महाविद्यालयांचे शुल्क ठरविते. पर्यायाने वेतनाची रक्कम शेवटी पालकांच्याच खिशातून वसूल केली जाते. (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतल्याचे आपण ऐकले. मात्र प्रत्यक्षात या संबंधीचा आदेश आपल्यापर्यंत अद्याप पोहोचला नाही. शिक्षण शुल्क समितीमार्फत ही चौकशी होऊ शकते.
- डॉ. एस. के. महाजन, संचालक, तंत्र शिक्षण विभाग, मुंबई