पीसीएम गटात विजय, स्मितची बाजी
By admin | Published: June 4, 2017 01:34 AM2017-06-04T01:34:28+5:302017-06-04T01:34:28+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामाईक परीक्षेचा निकाल, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामाईक परीक्षेचा निकाल, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) गटात २०० पैकी १९७ गुण मिळवून मुंबईच्या स्मित रामभिया आणि सोलापूरच्या विजय मुंद्रा यांनी बाजी मारली आहे. पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) गटात २०० पैकी १९० गुण मिळवत, अमेय माचवे याने प्रथम क्रमांक पटकवला आहे.
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी http://www.dtemaharashtra.gov.in/mhcet2017 या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेला १ लाख ८५ हजार ९६३ मुले आणि ९८ हजार २७६ मुली पीसीएम गटासाठी परीक्षेला बसल्या होत्या, तर १ लाख २२ हजार ३११ मुले आणि १ लाख १६ हजार ५४ मुली पीसीबी गटासाठी परीक्षेस बसले होते. या परीक्षेत २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात, तर १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी पीसीबी गटात १०० अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
पीसीएम गटातील २ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी गटात ५७३ विद्यार्थ्यांनी १५० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
मागासवर्गीय उमेदवारात पीसीएम गटात हृषिकेश पवार याने २०० पैकी १९० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे, तर पीसीबी गटात गौरव कचोळे याने २०० पैकी १८७ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकवला आहे.