अभयारण्यात चंदनाच्या लाकडांवर शिजवले मोराचे मांस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:53 PM2017-07-18T12:53:05+5:302017-07-18T23:36:03+5:30
लोणार येथे वन्यजीव अभायारण्यात मोराची शिकार करुन अभयारण्यातीलच चंदनाचे झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.
Next
>किशोर मापारी/ ऑनलाइन लोकमत
लोणार, दि. 18 - वन्यजीव अभायारण्यात भरदिवसा राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करुन अभयारण्यातीलच चंदनाचे झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. चंदनाच्या लाकडांवर मोराचे मांस शिजवून मेजवानी केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
सरोवराच्या काठावरच मोराचे मांस शिजवून खाल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत वनप्रेमीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
न्यजीव अभयारण्यात वनविभागाकडून अनेक दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिका-यांकडून वारंवार देण्यात येत असतात. मात्र स्थानिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे या अभायारण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोणार अभयारण्यात अनेक पक्षी आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पक्षी मोर यांची संख्या जास्त आहे मात्र दिवसेंदिवस या राष्ट्रीय पक्षाची होत असलेली शिकार पाहता लोणार अभयारण्यामध्ये मोरांची संख्या कमी होत आहे.
आतातर भरदिवसा लोणार अभयारण्यात मोराची शिकार होत असल्याचे भयावहक चित्र 17 जुलै रोजी समोर आले. 17 जुलै रोजी सकाळी अभयारण्याभोवती अनेक नागरिक फेरी मारत असतात. सरोवराच्या काठावर बसले असताना या नागरिकांना अभयारण्यातच किन्ही रोडपासून अवघ्या काही अंतरावर सरोवराच्या काठावर दोन चुल आढळुन आल्या. एवढेच नव्हे तर या ठिकाणी कागदाच्या पत्रावाळ्या त्यावर मांस आढळून आले ही बातमी वा-यासारखी शहरात पसरताच वन्यप्रेमीनी या ठिकाणी जाउन पाहणी केली असता अक्षरशः या ठिकाणी चंदनाच्या लाकडावर मोराचे मांस शिजवून मेजवानी घेतल्याचे आढळले.
याबाबत वन्यप्रेमीनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना याबाबतच्या सूचना दिल्या. मात्र तब्बल चार तासानंतर वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले मात्र प्रत्यक्षात जाणकारांनी यावेळी सांगितले की सदर मांस हे मोराचे आहे. या घटनेमुळे वन्यप्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .
लोणार वन्यजीव अभयारण्याचा नियमांची होत आहे पायमल्ली
ज्या ठिकाणी वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे त्या ठिकाणी अनेक नियम शासनाने लावण्यात आलेले आहे. दिवस निघाल्यापासून ते सूर्यास्तपर्यंत वन्यजीव अभयारण्यात जाणा-या येणा-याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. तसेच वन्यजीव अभयारण्यात कोणीही अग्निजन्य वस्तू नेण्यास बंदी आहे, असे असतानाही लोणार अभयारण्यात सररासपणे कुणीही वावरत असून यावर वनविभागाचा अंकुश नाही.
लोणार अभयारण्याच्या काठावर अज्ञात सात ते आठ जणांनी मोर या पक्षाची शिकार करून या मोराचे मास सरोवराच्या काढावरच शिजवण्यात आलं. ही घटना 16 जुलै रोजी सांयकाळी घडली असल्याचे बोलले जात आहे. 16 जुलैच्या रात्री 9 वाजल्यापासून पाऊस असल्यामुळे हे कृत्य 16 जुलै रोजी सांयकाळी 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान घडले असल्याची चर्चा आहे. यामध्ये वनविभागाचे कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याची चर्चा आहे.