शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीची बैठक
By admin | Published: February 27, 2017 05:22 AM2017-02-27T05:22:38+5:302017-02-27T05:22:38+5:30
शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची विशेष बैठक रविवारी पनवेल तालुक्यातील तारा येथे संपन्न झाली.
पनवेल : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची विशेष बैठक रविवारी पनवेल तालुक्यातील तारा येथे संपन्न झाली.
बैठकीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार विवेक पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्याम म्हात्रे, आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुरेश लाड, काँग्रेसचे पनवेल तालुका चिटणीस नारायण ठाकूर, शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांचा एकमेकांशी परिचय होण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदस्यांसाठी लवकरच आदर्श कार्यपद्धती आणि अधिकारांचा योग्य वापर यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजिले जाणार असल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. तसेच वेळोवेळो सदस्यांचे आॅडिट करणार असल्याचे सूतोवाचही यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)
>२०१९च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही एकदिलाने काम करू. जातीयवादी शक्तींना थांबवण्याच्या कार्याची सुरु वात रायगडातून झाली असून त्याचा मला अभिमान आहे. पुरोगामी विचारांना जनाधार मिळत आहे, तेसुद्धा त्याचेच द्योतक आहे.
- सुनील तटकरे,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
>रायगड जिल्ह्यातील आघाडी ही एक विचारधारा टिकवण्यासाठी झाली आहे. सत्ता प्राप्त करणे हे आघाडीचे ध्येय नाही. सध्या जातीयवादी विचार पुरोगामी विचारांचा गळा घोटू पाहात आहेत. म्हणून आपण एकत्रित काम करणार आहोत. जनसेवा करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पंचायत समिती आहे. असे कार्य करा की जनतेनी पुन्हा निवडून दिलेच पाहिजे.
- जयंत पाटील, आमदार