तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:34 AM2021-06-11T07:34:26+5:302021-06-11T07:38:26+5:30
राज्य शासन देत असलेली व्याजदर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हींचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज आकारणी केली जाईल. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी हा निर्णय घेतला.
राज्य शासन देत असलेली व्याजदर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हींचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सुधारणा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. पीककर्जावर एकूण ६ टक्के व्याज आकारले जाते. त्यातील तीन टक्के व्याज सवलत केंद्र सरकार देते. आज राज्य शासनाने तीन टक्के सवलतीचा निर्णय घेतल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य व्याज पडणार आहे.
अल्पमुदत पीक कर्ज परतफेडक कर्ज
- अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत एक टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती.
- आता १ लाख ते ३ लाख कर्ज मर्यादेमध्ये परतफेड ३० जूनपर्यंत केल्यास आणखी दोन टक्के सवलत आजच्या निर्णयाने मिळेल.