अवकाळीने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे; राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:38 AM2019-11-01T01:38:10+5:302019-11-01T01:38:29+5:30

हजारो कोटींचे नुकसान, बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू

Peasant bust; Crops over millions of hectares in the state are in danger | अवकाळीने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे; राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

अवकाळीने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे; राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

Next

कोल्हापूर : परतीचा पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामुळे होणारे नुकसान हजारो कोटी रुपयांत जाण्याची शक्यता आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावरच नुकसानीचा नेमका आकडा कळेल. मात्र, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेला आहे. त्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकांचे महापुरामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर अतिवृष्टीमुळे २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. भाजीपाला, भात, बाजरी, रब्बी ज्वारीचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. सांगली जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा हा आकडा एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातही ७० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा फटका बसला. बागांमध्ये पाणी साठल्यामुळे मुळे कुजू लागली आहेत. घडातील मणी गळून पडत आहेत. आॅक्टोबरमध्ये छाटणी झालेल्या बागांवर दावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

विदर्भातील अमरावती विभागाला अवकाळीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. पाच हजार ३८२ गावांतील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. १० लाख ५२ हजार २२ शेतकºयांच्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, धान या पिकांचे नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. खान्देशातही अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील (पान ६ वर) ज्वारी, कापूस, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे लिंबू आणि संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू केले आहेत.

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे आठ ते दहा लाख हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात क्यार वादळ आणि पावसामुळे भात, सुपारी, नारळ, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील आपद््ग्रस्तांना स्वतंत्रपणे ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.


राज्यात द्राक्ष उत्पादनात अव्वल असणाºया नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. अधिकृत नोंदणी झालेल्या पावणेदोन लाख एकर द्राक्ष बागा गळ, कूज, डाऊनी, भुरी या रोगांनी वाया गेल्या आहेत. यंदा द्राक्ष हंगाम अवघा तीस टक्के राहाणार आहे. ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. - केशव भोसले, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक

पीक नुकसानाच्या अर्जाची मुदत वाढवावी!
नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने कोणतीही अट न लावता भरपाई द्यावी, तसेच पीक नुकसानीच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून द्यावी, अशी मागणी अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

Web Title: Peasant bust; Crops over millions of hectares in the state are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस