परिवहन अधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटली गोळी
By Admin | Published: November 17, 2015 01:23 AM2015-11-17T01:23:54+5:302015-11-17T01:23:54+5:30
देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर परिवहन अधिकाऱ्याचे (आरटीओ) सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून त्यातून गोळी सुटली. ही गोळी एका ट्रक चालकाच्या जांघेत शिरल्याने,
गोंदिया : देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर परिवहन अधिकाऱ्याचे (आरटीओ) सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून त्यातून गोळी सुटली. ही गोळी एका ट्रक चालकाच्या जांघेत शिरल्याने, त्याला येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती धोक्यावर बाहेर आहे.
ट्रकमध्ये केळी भरून मोहम्मद साबीर खान (३६) हा भुसावळवरून ओडिसाकडे जात होता. देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर तो शनिवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास पोहोचला. आपले परमिट दाखवत असताना, आरटीओ नितीन उईके यांनी टेबलावर ठेवलेले सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडले व त्यातून गोळी सुटली. ही गोळी टेबलसमोर उभ्या असलेल्या साबीर खान याच्या उजव्या पायाच्या जांघेतून निघून डाव्या पायाच्या जांघेत शिरली. उईके यांनी लगेच त्यांना आपल्या गाडीत टाकून उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री ९ वाजतादरम्यान दाखल केले.
सद्यस्थितीत देवरी पोलिसांनी या घटनेची नोंद केलेली नाही. या प्रकरणी देवरीचे पोलीस उपनिरीक्षक शेलके म्हणाले की, ‘ट्रकचालक पोलिसांत तक्रार नोंद करू इच्छित नाही. तो याला अचानक घडलेली घटना समजत आहे. तथापि, यात जर काही दोष आढळेल, तर निश्चितच प्रकरणाची नोंद केली जाईल.’ (प्रतिनिधी)