पेण अर्बनचे पुनरुज्जीवन शक्य
By admin | Published: January 28, 2015 04:54 AM2015-01-28T04:54:58+5:302015-01-28T04:54:58+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प (नयना) क्षेत्रात पेण अर्बन बँकेच्या कर्जांचा बोजा असणारी तब्बल दोन हजार गुंठे जमीन आहे.
जयंत धुळप, अलिबाग
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प (नयना) क्षेत्रात पेण अर्बन बँकेच्या कर्जांचा बोजा असणारी तब्बल दोन हजार गुंठे जमीन आहे. त्या जमिनीचा मोबदला प्रति गुंठा एक कोटी या दराने पेण अर्बन बँकेस मिळाल्यास बँकेकडे २ हजार कोटी रुपये जमा होतील. त्यामुळे बँकेच्या विद्यमान ठेवीदारांचे ६३२ कोटी रुपये परत देऊन, बँकेचे पुनरुज्जीवन करणे सहज शक्य होईल, असा दावा ‘पेण अर्बन बँक ठेवीदार हक्क संघर्ष समिती’चे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी केला. ते मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.
नयना प्रकल्प क्षेत्रात सरदार बिवलकर यांची १५७ एकर जमीन आहे. ही जमीन विमानतळाकरिता संपादित करून सिडकोने आम्हाला पर्यायी जागेऐवजी पूर्ण आर्थिक मोबदलाच चालू जमीन बाजारभावाप्रमाणे द्यावा, अशी मागणी सरदार बिवलकर विरुद्ध सिडको या खटल्यात करण्यात आली होती. या जमिनीचा एकूण १५०० कोटी रुपयांचा मोबदला बिवलकर यांच्या वारसांना सिडकोने द्यावा, असा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. परिणामी नयना प्रकल्प क्षेत्रात एक गुंठा जमिनीचा बाजारभाव एक कोटी रुपये आहे, हे स्पष्ट झाले आहे. पेण अर्बन बँकेच्या कर्जबोजाच्या दोन हजार गुंठे जागेचे संपादन करून त्याचे दोन हजार कोटी बँकेस द्यावेत, अशी मागणी असल्याचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सांगितले.
बँकेच्या कर्जदारांकडून कर्ज वसुलीचा प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. कर्जदार परतफेड करण्यात असमर्थ ठरल्यास त्याची वसुली जमीनदारांकडून करण्यात येणार असल्याने कर्जदार मोकळे सुटू शकत नाहीत, असे जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बँकेच्या प्रशासक मंडळाने एकरकमी कर्ज परतफेड योजना अमलात आणली आहे. त्याकरिता कर्जदार व त्यांच्या जामीनदारांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.