धनादेश न वटल्यास वीजग्राहकांना होणार १,५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:10 AM2018-12-01T06:10:11+5:302018-12-01T06:10:28+5:30

विद्युत नियामक आयोग : महावितरणच्या मध्यावधी आढाव्यातून आदेश

Penalty for 1,500 rupees for power consumers | धनादेश न वटल्यास वीजग्राहकांना होणार १,५०० रुपयांचा दंड

धनादेश न वटल्यास वीजग्राहकांना होणार १,५०० रुपयांचा दंड

Next

मुंबई : वीजबिलाचा भरणा केलेला धनादेश न वटल्यास (चेक बाउंस झाल्यास) आता ३५० रुपयांऐवजी १,५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल, त्या रकमेचा दंड वीजग्राहकांना लावण्यात येणार आहे. वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरणने दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने हा आदेश दिला आहे.


महावितरणच्या १६ परिमंडलातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. मात्र, यातील सुमारे दहा हजार धनादेश महिन्याला विविध कारणांमुळे बाउन्स होतात.
याकरिता संबधित वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता, परंतु आता १,५०० रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल, तो दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.


दरम्यान, राज्यातील सुमारे ३२ लाख ग्राहक दरमहा अंदाजे ५४६ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा आॅनलाइनद्वारे करतात.

अशी होणार कारवाई
वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे. मुदतीनंतर बील भरल्यास ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागू होते. कोणत्याही कारणाने चेक बाउंस झाला, तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

Web Title: Penalty for 1,500 rupees for power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.