सुनावणी तहकूबप्रकरणी बचाव पक्षाच्या वकिलांना दंड

By admin | Published: May 3, 2017 04:14 AM2017-05-03T04:14:41+5:302017-05-03T04:14:41+5:30

२००२ घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सय्यद ख्वाजा युनूस पोलीस कोठडी मृत्यू खटल्याप्रकरणी डॉ. अब्दुल मतीन

Penalty for defense party advocates for hearing | सुनावणी तहकूबप्रकरणी बचाव पक्षाच्या वकिलांना दंड

सुनावणी तहकूबप्रकरणी बचाव पक्षाच्या वकिलांना दंड

Next

मुंबई : २००२ घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सय्यद ख्वाजा युनूस पोलीस कोठडी मृत्यू खटल्याप्रकरणी डॉ. अब्दुल मतीन याची मंगळवारी साक्ष नोंदवण्यात आली. मतीन हा या खटल्यातील पहिला साक्षीदार आहे. मात्र त्याची साक्ष सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणी तहकूब करण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने बचाव पक्षाची मागणी मान्य केली. परंतु, बचाव पक्षाला २००० रुपयांचा दंड ठोठावला.
घाटकोपर बॉम्बस्फोटात अब्दुल सह-आरोपी होता. मात्र अन्य आरोपींसह त्याचीही या आरोपातून सुटका झाली. तर माजी पीएसआय सचिन वझे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, राजाराम निकम आणि सुनील देसाई हे सय्यद ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडी मृत्यूप्रकरणी आरोपी आहेत.
मंगळवारी विशेष सरकारी वकिलांनी अब्दुलची साक्ष नोंदवण्याचे काम सुरू केले. अब्दुलने दिलेल्या साक्षीनुसार, घाटकोपर बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी त्याला २३ डिसेंबर २००२ रोजी अटक केली. मात्र त्याला न्यायालयात २७ डिसेंबर रोजी हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा २ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी आणखी तीन व्यक्तींना या बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामध्ये ख्याजा युनूसचा समावेश होता.
‘पोलीस कोठडीत सर्व आरोपींची छळवणूक करण्यात आली,’ असे अब्दुल न्यायालयाला सांगत असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाला केली. केस डायरी आणि अन्य काही कागदपत्रे बचावपक्षाच्या वकिलांना हवी आहेत आणि न्यायालयाने ती कागदपत्रे बचाव पक्षाला देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देऊनही त्यांनी ती अजून दिलेली नाहीत. त्यामुळे सुनावणी तहकूब करण्यात यावी, अशी विनंती बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला केली.
जर या आधारावर सुनावणी पुढे ढकलायची असेल तर बचाव पक्षाच्या वकिलांनी अर्ज करायला हवा. अशा प्रकारे सुनावणी तहकूब करता येणार नाही, असे न्या. आर.जी. वानखेडे यांनी बचावपक्षाच्या वकिलांना सांगितले. तरीही बचावपक्षाच्या वकिलांनी सुनावणी तहकूब करण्याचा आग्रह न्यायालयाला धरला. त्यांची विनंती मान्य करत न्यायालयाने यापुढे सुनावणी तहकूब करणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र मंगळवारची सुनावणी तहकूब केल्याबद्दल बचावपक्षाच्या वकिलांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावत ही रक्कम अब्दुलला देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Penalty for defense party advocates for hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.