पेंग्विनचा निवारा निश्चित!

By Admin | Published: March 7, 2017 01:43 AM2017-03-07T01:43:15+5:302017-03-07T01:43:15+5:30

मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आल्यामुळे राणीच्या बागेतील सात पेंग्विन आता मुंबईचेच रहिवाशी होणार हे स्पष्ट झाले

Pengvin's shelter fixed! | पेंग्विनचा निवारा निश्चित!

पेंग्विनचा निवारा निश्चित!

googlenewsNext


मुंबई : मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आल्यामुळे राणीच्या बागेतील सात पेंग्विन आता मुंबईचेच रहिवाशी होणार हे स्पष्ट झाले आहे़ त्यानुसार बर्फाळलेल्या प्रदेशातून स्वप्नाच्या मायानगरीत आल्यापासून सतत निगराणीखाली बंदिस्त कक्षात असलेल्या या पाहुण्यांना अखेर आठ महिन्यांनंतर हक्काचे घर मिळाले आहे़ प्रशस्त काचघरात आज सकाळी त्यांचे स्थलांतर झाल्यानंतर थोडी बावरलेली ही मंडळी लवकरच मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत़
दक्षिण कोरियातून हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन जुलै २०१६ मध्ये मुंबईत आणण्यात आले़ मात्र एका पेंग्विनचा आॅक्टोबर महिन्यात आतड्यांच्या संसर्गामुळे मृत्यू झाला़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले़ यामुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात प्राण्यांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला़ मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात हा मुद्दा विरोधकांनी पेटवत पेंग्विनची रवानगी त्यांच्या मायदेशी करण्याचा दबाव टाकण्यात आला़
पेंग्विनच्या मुद्दावरुन असे राजकारण पेटले असताना राणीच्या बागेत या पाहुण्यांसाठी विशेष कक्ष तयार करण्यातही दिरंगाई होत होती़ प्रशस्त काचघर तयार करुन पेंग्विनसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात बराच काळ लागला़ यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन निवडणुकीपूर्वी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्नही फसला़ निवडणुकांनंतर या कामांनाही वेग आला असून काचघर तयार झाले आहे़ त्यानुसार या काचघरात सात पेंग्विनना आज सकाळी ६ वाजता हलविण्यात आले़
> नवीन घरात पाहुणे बावरले
बर्फाच्या गोळ्यासारखे पण तितकेच लोभस रुप असलेले हे पेंग्विन राणीच्या बागेतील एका छोट्याशा जागेत गेले आठ महिने राहत होते़ पेंग्विनवरुन मुंबईत वाद रंगले असताना ते मात्र यापासून बेखबर आपल्या नवीन घरात वावरत होते़ हळुहळू ते तिथे रुळायला लागले होते़ त्यामुळे आज नवीन काचघरात त्यांना हलविल्यानंतर काही क्षणांसाठी ते बावरले होते़ पण काही दिवसांतच ते या प्रशस्त काचघरातही रुळतील़, असा विश्वास राणीबागेचे संचालक डॉ़ संजय त्रिपाठी यांनी सांगितले़
उद्घाटन सोहळ्याची अनिश्चितता
महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना निवडणूक पूर्वीच घडविण्याचे शिवसेनेचे स्वप्न होते़ मात्र अनंत अडचणींमुळे हा उद्घाटन सोहळा तीनवेळा लांबणीवर पडला़ गेल्याच आठवड्यात मावळत्या स्थायी समितीच्या सदस्यांनी राणीबागेची पाहणी केली़ स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव हे दोघे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्या कारर्कीदीची मुदत संपण्याआधी हा उद्घाटन सोहळा होण्यासाठी ते आग्रही होते़ मात्र पेंग्विन नवीन घरात जाऊन रुळेपर्यंत उद्घाटन नाहीच़, अशी भूमिका प्रशासनाने घेतली़ त्यामुळे शिवसेनेच्या या शिलेदारांचा हिरमोड झाला़
असे आहे नवे काचघर : या पेंग्विनचे आता कायमस्वरुपी घर असलेल्या राणीबागेतील काचघर १८ हजार चौरस फुटांचे आहे़ यामध्ये पेंग्विनना मुक्त विहार करण्यासाठी चारशे चौरस फुटांचा तलाव आहे़ २० पेंग्विन राहू शकतील, एवढी ही जागा असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, अशी खात्री महापालिकेने दिली आहे़ तसेच या ठिकाणी स्वयंपाकघर व पेंग्विनना जेवण देण्यासाठी फिडींग एरिया असणार आहे़
एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़
सद्यस्थितीत १२ ते १५ सें़मी़ उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सें़मी़ इतकी होईल़
त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा कि़लो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़

Web Title: Pengvin's shelter fixed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.