चेंबूर परिसरात साथीचे आजार
By admin | Published: September 21, 2016 02:43 AM2016-09-21T02:43:55+5:302016-09-21T02:43:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. अशाच प्रकारे चेंबूरमधील अनेक झोपडपट्टी परिसरांत डेंग्यू, मलेरिया आणि कावीळचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
चेंबूरमधील पी.एल. लोखंडे मार्ग, घाटला गाव, कोकण नगर, सिद्धार्थ कॉलनी, महात्मा फुले नगर, सिंधी कॅम्प, लालडोंगर, गुलशन बाग, खारदेव नगर, पी. वाय. थोरात मार्ग, माहुल गाव आणि सिद्धार्थ कॉलनी या विभागांत सध्या मोठ्या प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली आहे. या परिसरात पावसाळ्यात सतत पाणी साचत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे; तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने या ठिकाणी मलेरिया आणि डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळत आहेत.
चेंबूरच्या एम पश्चिम विभागात जून ते सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ४९ तसेच डेंग्यूचे ३ रुग्ण सापडले आहेत. तर संशयित रुग्णाची संख्या वाढत आहे. सिद्धार्थ कॉलनीतील एकाच घरातील दोन भावांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. या परिसरात मलेरिया रुग्णांची संख्याही मोठी आहे. पालिकेला याबाबत माहिती मिळताच पालिकेने परिसरात धूरफवारणी सुरू केली आहे. मात्र साथीच्या आजारांबाबत पालिकेकडून योग्य उपाययोजना करण्यात येत नसल्यानेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. (प्रतिनिधी)