पेणच्या बाप्पांचा परदेश प्रवास झाला सुरू
By admin | Published: April 27, 2016 03:05 AM2016-04-27T03:05:00+5:302016-04-27T03:05:00+5:30
महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या ५ सप्टेंबर २०१६ पासून ते १५ सप्टेंबरपर्यंत थाटात होणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
दत्ता म्हात्रे,
पेण-महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या ५ सप्टेंबर २०१६ पासून ते १५ सप्टेंबरपर्यंत थाटात होणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. परदेशात असलेल्या मराठी व अन्य अनिवासी भारतीय गणेशभक्तांनी बाप्पाच्या मूर्तींची आॅर्डर पेणच्या जगप्रसिद्ध मूर्तीनिर्मात्याकडे थेट नोंदणी केल्याने या गणेशभक्तांच्या मागणीची पूर्तता करीत पेणच्या दीपक कला केंद्रातून तब्बल ४,५०० गणेशमूर्ती परदेशात रवाना होण्यास सिद्ध झाल्या आहेत. जेएनपीटी बंदरातून बाप्पाच्या मूर्तींनी भरलेले सहा कंटेनर, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, यूएसए व बँकॉक या देशांत निघाले असून, समुद्रमार्गे बाप्पांचा हा प्रवास ४५ दिवस चालणार आहे. बाप्पाच्या परदेशवारीला यानिमित्ताने चांगला प्रारंभ होत असून, अक्षय्यतृतीयेच्या शुभदिनी विघ्नहर्ता गणराय परदेशी टूरवर निघणार आहे.
यंदाचा गणेशोत्सवाचा प्रारंभ सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. त्याचबरोबर या वर्षीचा मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत फिजी आॅस्ट्रेलिया येथील फिजी सेवाश्रम संघ या मराठी व भारतीय नागरिकांच्या संस्थेने काळजी घेत आपली गणेशमूर्तींची आॅर्डर या वर्षी १५ दिवस अगोदरच पूर्ण करण्यावर भर देत आहे. पेणच्या दीपक कला केंद्रातून आॅस्ट्रेलिया फिजी येथे ४०० मूर्ती, युनायटेड स्टेट अमेरिका २००० मूर्ती, कॅनडा १,५०० मूर्ती व बँकॉक ५०० मूर्ती अशा प्रकारे ४,५०० एकूण गणेशमूर्तींची मागणी पूर्ण करण्यासाठी दीपक कला केंद्रातर्फे मूर्तींचे बॉक्स पॅकिंग पूर्ण करून या मूर्ती कंटेनरमध्ये बंदिस्त केल्या आहेत. परदेशात स्थायिक अनिवासी भारतीयांची ही पहिली आॅर्डर असून, मेअखेरपर्यंत इतर परदेशात स्थायिक सर्व आॅर्डर पूर्ण होतील, असे कार्यशाळेचे प्रमुख नीलेश समेळ यांनी सांगितले.
फिजी आस्ट्रेलियामध्ये पाठविण्यात येत असलेल्या गणेशमूर्ती सहा फूट उंचीच्या असून, प्रथमच मोठ्या मूर्तींची मागणी झाली. सहा इंचीपासून दोन फुटांपर्यंतच्या मूर्तींचाही समावेश आहे. या वर्षीची नवी मॉडेल म्हणून ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील बाजीराव पेशवाई पगडीतील बाप्पांच्या बसलेल्या मूर्तीचा समावेश आहे. तसेच गणेशभक्तांना आवडणाऱ्या व लोकप्रिय ठरलेल्या अनेक मॉडेल्सच्या मूर्तींचा समावेश या परदेशी मागणीत आहे. पावसापूर्वी या आॅर्डर पूर्ण करण्याकडे कार्यशाळेचा कल आहे.