शीख दंगलीतील मृतांच्या वारसांना मिळणार पेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:50 AM2019-01-05T01:50:47+5:302019-01-05T01:50:56+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली उसळलेल्या दंगलीतील मृतांच्या नातेवाइकांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली उसळलेल्या दंगलीतील मृतांच्या नातेवाइकांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर दंगली उसळल्या होत्या. शीख समाजाला या दंगलीत लक्ष्य करण्यात आले होते. या संदर्भात नेमण्यात आलेल्या न्या. नानावटी यांच्या आयोगाने दंगलीतील बाधितांना मदत करण्याची शिफारस केली होती. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने २००६ साली विशेष पॅकेज जाहीर केले. ही शिफारसीनुसार राज्यात ८४च्या दंगलीतील मृतांच्या वारसांना दरमहिना अडीच हजार इतकी पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात अहमदनगर आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी दोन लोक या दंगलीत ठार झाले होते. या मृतांच्या नातेवाइकांना दरमहा अडीच हजारप्रमाणे पेन्शन देण्यात येणार असून, त्याबाबत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.