‘एकट्या’ कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना पेन्शन
By admin | Published: January 28, 2015 04:48 AM2015-01-28T04:48:07+5:302015-01-28T04:48:07+5:30
राज्यातील एकट्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना आता पेन्शनचा लाभ घेता येणार आहे़
नारायण जाधव, ठाणे
राज्यातील एकट्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना आता पेन्शनचा लाभ घेता येणार आहे़ याबाबतचा निर्णय सरकारने गेल्या आठवड्यात घेतला असून तो ज्यांना शासनाची पेन्शन योजना लागू आहे त्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आणि जिल्हा परिषदांतील ‘एकट्या’ शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना हा निर्णय गुरुवारपासून लागू करण्यात आला आहे़
ज्यांच्या पश्चात पत्नी किंवा पतीसह मुले हयात नाहीत, आईवडिलांचा सांभाळ करायला त्याच्याशिवाय दुसरे कुणी नाही, किंवा ज्यांचे दुसरे कोणते उत्पन्नाचे साधन नाहीे, अशा कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे़ मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना शासनास विहीत नमुन्यात शपथपत्राद्वारे आपल्या पालकांच्या नावांची घोषणा केलेली असावी़ ही अट नियतमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्तीवेतनास पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू आहे़ तरच त्याच्या पालकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे़ मात्र, ज्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असेल किंवा विनापरवानगी अनुपस्थितीच्या काळात त्याचा मृत्यू झाला असेल, अशा कर्मचाऱ्यांच्या पालकांना ही योजना लागू राहणार नाही, असे वित्त विभागाने बजावले आहे़