भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
By यदू जोशी | Published: September 21, 2024 05:02 AM2024-09-21T05:02:09+5:302024-09-21T05:02:26+5:30
गर्दी जमविण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडे सभेसाठी पाठवायला तीच ती माणसे असतात.
यदु जोशी
मुंबई : भाजपच्या प्रचारसभेला खूप गर्दी झाली, त्याच मैदानावर दोन दिवसांनी काँग्रेसची सभा झाली तर तिथेही मोठी गर्दी, पण वैशिष्ट्य असे की, याही सभेला तेच लोक आणि त्याही सभेला तेच लोक... होय! असे चित्र तुम्हाला दिसू शकते. कारण गर्दी जमविण्याचे कंत्राट घेण्यासाठी काही कंपन्यांचे लोक राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत.
अशा दोन-तीन कंपन्या आहेत की, ज्या सभांचे मॅनेजमेंट करण्याचे कंत्राट घेतात. सभेची विविध माध्यमांतून प्रसिद्धी करण्यापासून तर सभा भरगच्च उपस्थितीत यशस्वी करून दाखविण्यापर्यंतची हमी या कंपन्या देतात. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अलीकडे एका कंपनीचे लोक आले, त्यांनी गर्दी कशी जमविणार याबाबतचे चक्क सादरीकरण केले. या कंपनीसह आणखी एक-दोन कंपन्यांनी काँग्रेस, शिंदेसेना, अजित पवार गट यांच्याशीही संपर्क साधला आणि आम्हाला हे काम द्या, आम्ही सभा यशस्वी करून दाखवतो, असे सांगितले.
गर्दी जमविण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडे सभेसाठी पाठवायला तीच ती माणसे असतात.
मुंबई व एमएमआरमधील सभांसाठी विशेषत: ठाणे, कल्याण, भिवंडी, मिरा-भाईंदर या भागातून भाडोत्री माणसे रोजंदारीवर आणली जातात. एखाद्या सभेला पाच हजार माणसे लागणार असतील तर त्यातील किती मुस्लिम पाहिजेत हेही आम्ही आधीच विचारून घेतो आणि तसा पुरवठा करताे, असे एका कंपनीच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
माणसी हजार रुपये तुम्हाला गर्दीसाठी द्यावे लागतील. आम्ही सभा यशस्वी करून दाखवू. सभेसाठी आम्ही ज्यांना आणू त्यांच्या नाश्ता-पाण्याची व्यवस्थाही आम्हीच करू. त्यांची तक्रार येऊ देणार नाही, असा शब्दही हे कंपनीचे लोक देत आहेत.
काळजीच करू नका
बरेचदा ज्या पक्षाच्या सभेसाठी असे भाडोत्री लोक आलेले असतात त्यांना त्या पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे नेते कोण हे काहीही माहिती नसते.
चॅनेलचे पत्रकार त्यांना सभेनंतर प्रश्न विचारतात आणि ते चुकीची, हास्यास्पद उत्तरे देतात. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होते असे प्रकार अनेकदा घडल्याने आता या कंपन्या सतर्क झाल्या आहेत.
सभेला आम्ही पाठविणार असलेल्यांना लोकांना सभेला जाण्यापूर्वी आपल्या पक्षाची नीट माहिती आम्ही देऊ, त्याची काळजी करू नका, या शब्दांत ते राजकीय पक्षांना आश्वस्त करत आहेत.