मंत्रालयातील सहाव्या, सातव्या मजल्यावर झुंबड; राजेश टोपेंनाही अक्षरश: खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:08 AM2022-10-13T06:08:57+5:302022-10-13T06:09:18+5:30
सातव्या मजल्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच संपूर्ण मजला गर्दीने फुलला होता. याशिवाय सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दालनांबाहेरही लोकांची मोठी गर्दी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिंदे - भाजप युतीचे सरकार आल्यापासून मंत्रालयातील गर्दी वाढली असून, बुधवारी या गर्दीने उच्चांक केल्याचे चित्र मंत्रालयातील सहाव्या-सातव्या मजल्यावर पाहायला मिळाले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री मंत्रालयात होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अभ्यागतांनी मंत्रालयात एकच गर्दी केली होती.
सातव्या मजल्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच संपूर्ण मजला गर्दीने फुलला होता. याशिवाय सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दालनांबाहेरही लोकांची मोठी गर्दी होती. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर सातव्या मजल्यावरील ही गर्दी सहाव्या मजल्यावर आल्याने गर्दी झाली होती.
माजी मंत्री टोपेंनाही खडसावले
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर तर गर्दीचा कहर झाला होता. त्यावर नियंत्रण मिळविताना सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचीही दमछाक होत होती. या गर्दीतून वाट काढताना मंत्र्यांनाही मुश्कील जात होते. याच गर्दीत सहाव्या मजल्यावर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर उभे होते. त्या गर्दीत पोलिसांनी टोपेंना न ओळखल्याने त्यांना तिथून बाजूला उभे राहा, असे अक्षरश: खडसावले.