खासदार जलील यांच्यापर्यंत आमच्या वेदना पोहोचवाव्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:40 PM2019-11-05T12:40:57+5:302019-11-05T15:47:42+5:30
शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले एमआयएम पक्षाचे एकमेव आमदार इम्तियाज जलील हरवले असल्याचे निवेदन नुकतेच औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मतदारसंघात नागरी समस्या असताना जलील नेमके कुठे हरवले ? त्यांचा शोध लावण्याचे अनोखे पत्र वैजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रियाजोद्दीन शेख यांनी प्रशासनाला दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जलील यांची मोठ्याप्रमाणावर चर्चा झाली होती. त्यातच त्यांनी संसदेत मराठीत शपथ घेतल्याने त्यांचे अनेकांनी कौतुक सुद्धा केले. परंतु निवडून आल्यापासून जलील यांनी औरंगाबाद शहर सोडले तर मतदारसंघातील ग्रामीण भागात पाठ फिरवली असल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे वैजापूर येथील समाजिक कार्यकर्ते यांनी जलील हरवले असल्याचे निवदेन प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्याचे खासदार पद भूषवताना जलील यांना ग्रामीण परिसराचा पूर्णपणे विसर पडला आहे. काही दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करत आहे. मात्र असे असताना सुद्धा खासदार जलील कुठेच दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हरवलेल्या खासदार जलील यांची प्रशाकीय बैठकीदरम्यान भेट झाल्यास त्यांना आमच्या अडचणीचे पत्र पोचविण्यासाठीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.