CoronaVirus: लोकांना अंधारातून काढावी लागते वाट; नारंगी परिसरात पालिकेची दिवाबत्ती गुल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:12 PM2021-04-24T23:12:10+5:302021-04-24T23:12:27+5:30
नारंगी परिसरात पालिकेची दिवाबत्ती गुल
पारोळ : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक जीव मुठीत धरून घरात बसून आहेत. काही महत्त्वाच्या साहित्यासाठी लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केलेले आहे. मात्र आता नारंगी परिसरातील काही भागात पथदिवे बंद असल्याने या कामांसाठी बाहेर जातानाही नागरिक तसेच रुग्णाचे नातेवाईक यांना अंधारातून वाट काढावी लागत आहे.
जीवनावश्यक वस्तू व या महामारीत लागणारी औषधे यासाठी नागरिकांना घराबाहेर पडावेच लागत आहे. रस्त्यावर रहदारी कमी असते. त्यातही अनेक जण औषधांच्या शोधात फिरत असतात. मात्र आधीच व्यापलेल्या नागरिकांना आता रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा सामना करावा लागतो आहे. नारंगी परिसरातील काही भागात पथदिवे बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर परिसरात काळोख असतो.
वसई महापालिकेच्या दिवाबत्ती विभागाच्या गोंधळ कारभाराचा फटका येथील रहिवाशांना बसतो. नारंगी बायपास रोड पालिकेच्या गार्डन शेजारून सदनिकांकडे रस्ता जातो आणि अनेक महिन्यापासून पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे याचा नाहक त्रास होत आहे. पालिका पथदिव्यांसाठी लाखो रुपये खर्च करत असून साधे रस्त्यावर लाईट ही नसतील तर हा पैसा जातो कुठे असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा असून, दुसरीकडे अंधाराचा फायदा घेत मद्यपी, चोरट्यांचा येथील वावर वाढला आहे. परिणामी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.