जनतेनेच लगावली आहे त्यांच्या कानाखाली
By Admin | Published: May 11, 2017 02:01 AM2017-05-11T02:01:55+5:302017-05-11T02:01:55+5:30
जनतेने ज्यांच्या कानाखाली वाजवून घरी बसविले, ते काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा करु नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जनतेने ज्यांच्या कानाखाली वाजवून घरी बसविले, ते काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा करु नये. ती त्यांची लायकीच नाही. मुख्यमंत्री सोडा, त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपाच्या नेत्यांनी बुधवारी दिले.
२७ गावांच्या विकासाचे घोंगडे काँग्रेसच्या आघाडी सरकारने भिजत ठेवल्याने या गावांचा विकास झाला नाही. तेव्हा सत्ता हाती असताना २७ गावांचा विकास करण्यापासून चव्हाण यांचे हात कोणी बांधून ठेवले होते, असा सवाल भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित केला.
कल्याण-डोेंबिवली स्मार्ट सिटी होणार आहे. ठाकुर्ली मोठागाव-माणकोली खाडी पूल, दुर्गाडी खाडीपूल सदा पदरी करणे, मेट्रो ट्रेन आणि कल्याण ग्रोथ सेंटरसह रिंग रोड हे महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. त्याचे कामही सुरु झालेले आहे. या सगळ््या गोष्टी कल्याण-डोंबिवलीसह २७ गावांच्या विकासासाठी आहेत. २७ गावातील ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटीचा निधी दिला आहे. याची काही एक माहिती नसताना २७ गावांच्या विकासासाठी निधी दिला नाही हे जुनेच तुणतुणे वाजवित बसणे. तसेच साडेसहा हजार कोटींच्या घोषणेचा विरोधक किती काळ किस पाडत बसणार आहेत, असा सवाल त्यांनी केला. या घोषणेचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी वारंवार केला आहे. त्यांनी मंजूर केलेल्या सगळ््या प्रकल्पांची रक्कम एकत्रित केल्यास साडेसहा हजार कोटींच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल. या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत चव्हाण यांनी केलेले बेताल वक्तव्य हे त्यांची लायकी नसतांना केले आहे. चव्हाण यांची बरोबरी मुख्यमंत्र्यांशी होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांविषयी काय व कसे बोलतो, याचे भान त्याना राहिलेले नाही. चव्हाण यांनी वायफळ बडबड केली आहे. यापुढे ते ठाणे जिल्ह्यात आले तर त्यांना भाजपचे कार्यकर्तेच धडा शिकवतील. त्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी दिला.
चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करुन सवंग प्रसिद्धी मिळविली असली, तरी त्यांना भाजपचे आव्हान आहे की, त्यांनी भाजपच्या साध्या कार्यकर्त्याच्या कानफटात मारुन दाखवावी. मुख्यमंत्री खूप लांबची गोष्ट आहे, असे भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी बजावले.
२७ गावांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांना विचारता ते म्हणाले, चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केले असून त्यांची ही स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असे वक्तव्य चव्हाणच काय कोणीही करु नये. साडेसहा हजार कोटी रुपये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आराखड्यावर खर्च करु, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. हा विषय जुना आहे. त्याचा संबंध २७ गावाशी जोडणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द ते पाळणार आहेत. त्यांच्याच पक्षातील काही मंडळींचा विरोध असल्याने निर्णय लांबणीवर पडला असला, तरी आज ना उद्या मुख्यमंत्री तो निर्णय घेतील यावर आमचा विश्वास आहे. या तापलेल्या तव्यावर इतरांनी राजकीय पोळी भाजून खालच्या स्तराची भाषा करु नये, अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला वझे यांनी लगावला.