मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली की वाईट?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'
By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 09:12 PM2021-01-15T21:12:01+5:302021-01-15T22:09:35+5:30
देशातील टॉप ५ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रं हाती घेऊन जवळपास सव्वा वर्षांचा कालावधी होत आला आहे आहे. या कालावधीत सरकारला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. याशिवाय अभिनेत्री कंगना राणौत, पत्रकार अर्णब गोस्वामी, सक्तवसुली संचलनालयाची कारवाई, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सरकारची कामगिरी चांगली झाल्याचं एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडत थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. यानंतर कोरोना पाठोपाठ अवकाळी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती अशा संकटांचा सामना राज्याला करावा लागला. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री ठाकरेंची कामगिरी चांगली झाल्याचं आकडेवारी सांगते.
“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”
मुख्यमंत्री ठाकरेंच्या कामगिरीबद्दल जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. राज्यातील ४६ टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर खूप समाधानी आहेत. तर ३२ टक्के लोक समाधानी आहेत. २० टक्के जनता ठाकरेंच्या कारभारावर असमाधानी आहे. देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.