जनतेलाच पुन्हा परिवर्तन हवंय - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 4, 2017 07:31 AM2017-02-04T07:31:59+5:302017-02-04T07:42:55+5:30
सत्ताधारी भाजपाने देशवासियांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून विश्वासघात केल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - सत्ताधारी भाजपाने देशवासियांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून विश्वासघात केल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केला आहे. 'अच्छे दिनच्या ‘स्वप्नभंगा’पासून नोटाबंदीच्या ‘मुखभंगा’पर्यंत अनेक गोष्टींमुळे जनतेचा फक्त भ्रमनिरासच झालेला नाही तर विश्वासाचाही घात झाला आहे. या अपेक्षाभंगाचे प्रतिबिंब 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पडणे अपरिहार्य आहे', अशी टीका करत जनताच परिवर्तन घडवून आणेल, असेही उद्धव म्हणाले आहेत.
शिवाय, गोव्यामध्ये शिवसेनेने मगोप आणि गोवा सुरक्षा मंचसोबत केलेल्या महायुतीमुळे सत्ताधा-यांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे, असा टोला त्यांनी हाणला आहे. एकूणच 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर विराजमान झाले होते, मात्र त्यांनी अच्छे दिनचे केवळ स्वप्नच दाखवून जनतेचा विश्वासघात केल्याने 2019 मध्ये लोकच परिवर्तन घडवून आणतील, असे सांगत उद्धव यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला इशारा देण्याचे काम केले आहे.
नेमके काय आहे सामना संपादकीयमध्ये?
‘परिवर्तना’चे पहिले पाऊल!
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडेल. वेगवेगळ्या टप्प्यात ८ मार्चपर्यंत मतदानाचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे सर्वत्र आश्वासनांची बरसात केली जात आहे. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविली जात आहे. अर्थात पंजाब आणि गोवा या दोन राज्यांपुरता निवडणुकीचा हा माहोल गुरुवार संध्याकाळपासून थंडावला आहे. पंजाब विधानसभेच्या ११७ आणि गोव्याच्या ४० मतदारसंघांत आज मतदानाचा पहिला फटाका फुटेल. गोव्यात सध्या भाजप तर पंजाबात अकाली दल – भाजप युतीचे सरकार आहे, परंतु या दोन्ही राज्यांत भाजपची नौका हेलकावे खात आहे. पंजाबात ‘ऑण्टिइन्कम्बन्सी’ तर गोव्यात शिवसेना, मगोप, गोवा सुरक्षा मंच यांच्या महायुतीची वज्रमूठ यामुळे सत्ताधाऱ्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे. पुन्हा आप आणि काँग्रेस हे दोन पक्षही आपापल्यापरीने जोर लावत आहेतच. या बहुरंगी लढतींचा कौल दोन राज्यांतील मतदार आज मतदान यंत्रामध्ये बंद करतील. पंजाबमधील जय-पराजयावर प्रामुख्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या भविष्यातील राजकीय कारकीर्दीचा शंख वाजतो की नाही हे ठरेल. पुढील काळातील राष्ट्रीय राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहतील, त्यात कोणत्या नेत्याची भूमिका किती महत्त्वाची असेल, कोणाचे घोडे राष्ट्रीय स्तरावर दामटले जाईल, ते धावू शकेल की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरेही पाच राज्यांची विधानसभा निवडणूक देणार आहे. उत्तर प्रदेश आणि त्यापाठोपाठ पंजाब ही दोन राज्ये त्यादृष्टीने अधिक महत्त्वाची आहेत. उत्तर प्रदेशात ४०३ तर पंजाबमध्ये ११७ जागा आहेत. अर्थात, जागांच्या संख्येबरोबरच ‘दिल्ली’चा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो ही वस्तुस्थिती महत्त्वाची आहे.
उत्तर प्रदेशातील मतदानाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारी रोजी आहे. पंजाबात मात्र आज मतदान आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांसाठी पंजाब आणि गोवा राज्यातील मतदान म्हणजे ‘पहिला पेपर’ आहे. त्याची तयारी सर्वांनी केली असली तरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे वातावरण आणि आजची स्थिती यात प्रचंड फरक पडला आहे. अच्छे दिनच्या ‘स्वप्नभंगा’पासून नोटाबंदीच्या ‘मुखभंगा’पर्यंत अनेक गोष्टींमुळे जनतेचा फक्त भ्रमनिरासच झालेला नाही तर विश्वासाचाही घात झाला आहे. या अपेक्षाभंगाचे प्रतिबिंब पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पडणे अपरिहार्य आहे. पुन्हा पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाने पोखरली गेलेली तरुण पिढी, शेतकरी आत्महत्या हे दोन मुद्देदेखील कळीचे ठरणार आहेत. गोव्यामध्ये शिवसेनेने ‘महायुती’च्या माध्यमातून उभ्या केलेल्या कडव्या आव्हानाने आजवर सुशेगाद असलेल्या भाजपच्या नौकेला तडाखे दिले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्याचा पहिला ‘अंक’ आज पंजाब आणि गोव्यात पार पडेल आणि राष्ट्रीय राजकारणाच्या ‘परिवर्तना’ची ती नांदी ठरेल. नाही तरी सध्या सत्ताधारी मंडळींचे ‘परिवर्तन’ या शब्दावर जरा जास्तच प्रेम जडले आहे. ‘च’वर जोर वगैरे देत त्यांच्या परिवर्तनाच्या बैठका मारणे सुरू आहे. मात्र मुळात आता देशातील जनतेलाच पुन्हा परिवर्तन हवे आहे. गेल्या वर्षी बिहारमधील निकालांनी या परिवर्तनाची दिशा दाखवली आहे. पाच राज्यांतील मतदानाची ‘सप्तपदी’ त्यावर शिक्कामोर्तब करील. पंजाब आणि गोव्यातील मतदार आज या परिवर्तनाचे पहिले पाऊल टाकतील याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही.