पोलीस ठाण्यात येताना लोकांना विश्वास वाटावा- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:42 AM2021-08-10T08:42:37+5:302021-08-10T08:43:13+5:30

पोलीस अकादमीच्या प्रकल्पांचे उद्घाटन

People should feel confident when they come to the police station says cm uddhav thackeray | पोलीस ठाण्यात येताना लोकांना विश्वास वाटावा- उद्धव ठाकरे

पोलीस ठाण्यात येताना लोकांना विश्वास वाटावा- उद्धव ठाकरे

Next

नाशिक : राज्याचे पोलीस दल अव्वलस्थानी आहेच; मात्र सर्वच पोलीस ठाण्यांमधील वातावरण हे पोलीस कर्मचाऱ्यांपासून तर सर्वसामान्य जनतेला आपले वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सामान्य माणसाला पोलीस ठाण्यात येताना विश्वास वाटला पाहिजे तर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना घाम फुटला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सोमवारी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉम्पोझिट इनडोअर फायरिंग रेंजसह विविध क्रीडा प्रकल्पांचे उद‌्घाटन ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांवर नाव कोरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यात काही गैर नाही ; मात्र राज्यातील खेळाडूंना त्यासाठी चांगल्या दर्जाच्या भौतिक सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे. आमचे सरकार त्याच दिशेने प्रयत्नशील असल्याचे ठाकरे म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पोलीस महासंचालक संजय पांडे व अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोलीस खेळाडू घडतील
पोलीस दलातून देखील चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी सरकारने मुबलक निधी उपलब्ध करुन देत चांगल्या दर्जाचे हॉकी व फुटबॉलचे मैदान, सिंथेटिक ट्रॅक, दोन बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्टची उभारणी केली. या अद्ययावत अशा क्रीडा प्रकल्पांचा प्रशिक्षणार्थी पोलिसांना नक्कीच फायदा होणार आहे. भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे पोलीस खेळाडू घडतील, असा आशावाद देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.

दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नाशिकमध्ये असताना एका दाम्पत्याने पोलिस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये जाणाऱ्या महिलेसह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिस पाठिशी घालत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. राजलक्ष्मी पिल्ले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव असून, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Web Title: People should feel confident when they come to the police station says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.