‘भारतमाता की जय’ बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत - उद्धव ठाकरे
By Admin | Published: April 7, 2016 08:29 AM2016-04-07T08:29:52+5:302016-04-07T11:34:38+5:30
‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या! या शब्दांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनेही याच मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्य दुष्काळामध्ये होरपळत असताना, महाराष्ट्रातील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरु असताना राष्ट्रभक्तींच्या आरोळयांनी कोणीही रोमांचित होणार नाही असे अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी मुख्यमंत्र्यांनी गर्जना केली असती तर ते अधिक बरे झाले असते असे अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखातील मुद्दे
महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले आहे व फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही. पाण्याच्या टाक्या व टँकरवर पोलिसांचे पहारे बसविण्यात आले असून पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला हे चित्र धक्कादायक आहे. ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या!
तिसरे महायुद्ध पाण्यासाठी लढले जाईल अशी शापवाणी अनेकांनी उच्चारली आहे. ती खरी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्रात या महायुद्धाची ठिणगी पडली आहे व पाण्यासाठी दंगली, मारामार्या सुरू झाल्याचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. सध्या ‘भारतमाता की जय’चे राजकारण जोरात सुरू आहे. खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारतमाता की जय’ बोलणारच असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठणकावले आहे हे छानच झाले, पण भारतमातेची लेकरे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तडफडत आहेत, पाण्यासाठी एकमेकांचे रक्त पिण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरे झाले असते.
मराठवाड्यातील तरुण घोटभर पाण्यासाठी शस्त्र हातात घेऊन दहशतवादी तर बनणार नाहीत ना? तसे झाले तर ‘भारतमाता की जय’ला काही अर्थ राहणार नाही. जनता सुखी तर भारतमाता सुखी. भारतमातेचा जय म्हणजे जनतेचा जय, पण जनतेला घोटभर पाणी नाही, गुरढोरे तडफडून मरत आहेत व शेतांचे स्मशान झाले आहे. या स्मशानात उभे राहून कोणी राष्ट्रभक्तीच्या आरोळ्या ठोकल्या तरी भारतमाता रोमांचित होऊन उठणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हेे आझादी दुंगी’ अशी भारतमातेची हाक होती, पण रक्ताचे शिंपण देऊन स्वतंत्र झालेल्या भारतमातेस पिण्याच्या पाण्यासाठी त्राही त्राही करावे लागत आहे.
पाण्याच्या साठ्यांवर डाकेदरोडे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. सटाणा तालुक्यात पाण्यासाठी महिलांनी ग्रामसेवक व सरपंचांना डांबून ठेवल्याचे प्रकरण जुने झाले असले तरी यापेक्षा भयंकर अशी नवी प्रकरणे तणावात भर घालत आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले आहे व फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही. पाण्यासाठी प. महाराष्ट्र, कोकण, ठाणे व मुंबईतही संघर्ष सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात व शहरात जेमतेम पाणीसाठा उरला आहे. ठाण्यातही पाण्यासाठी दंगली उसळतील अशी भीती ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली. हे सर्व चित्र महाराष्ट्राची बिकट अवस्था दाखवणारे आहे. पाणी नाही म्हणून उद्योग बंद होतील व बेरोजगारीचे संकट उभे राहील. भारतमातेच्या स्वप्नांची महाराष्ट्रात अशी धूळधाण सुरू आहे व भारतमातेच्या नावाने राजकारणाचे ढोल वाजवले जात आहेत.