विकास व परिवर्तनासाठी जनतेने प्रतीक्षा करावी

By Admin | Published: October 5, 2014 12:57 AM2014-10-05T00:57:24+5:302014-10-05T00:57:24+5:30

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुमारे पाच महिन्यांअगोदर सत्तेत आलेल्या रालोआ सरकारने इतक्या कमी कालावधीत जनतेसमोर आश्वासक चित्र उभे केले आहे. परंतु विकास घडवून आणण्यासाठी

People should wait for development and change | विकास व परिवर्तनासाठी जनतेने प्रतीक्षा करावी

विकास व परिवर्तनासाठी जनतेने प्रतीक्षा करावी

googlenewsNext

सरसंघचालकांचे मोदी सरकारला प्रशस्तीपत्रक:संघाचा विजयादशमी उत्सव
नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुमारे पाच महिन्यांअगोदर सत्तेत आलेल्या रालोआ सरकारने इतक्या कमी कालावधीत जनतेसमोर आश्वासक चित्र उभे केले आहे. परंतु विकास घडवून आणण्यासाठी कोणाकडेही जादूची कांडी नाही. त्यामुळे समृद्ध भारताच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी जनतेला थोडी प्रतीक्षा करावीच लागेल असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला.
संघाचा शस्त्रपूजन तसेच विजयादशमी उत्सव शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे पार पडला. यावेळी सरसंघचालकांनी आपल्या भाषणात निरनिराळ््या मुद्द्यांवर भाष्य केले. आंतरराष्ट्रीय संबंध अर्थव्यवस्था, राष्ट्राची सुरक्षा यासंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे विकसित व समर्थ भारताच्या निर्माणाचा विश्वास जनतेत उत्पन्न झाला आहे या शब्दांत सरसंघचालकांनी मोदी सरकारचे कौतुकदेखील केले.
केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक नेमके काय मार्गदर्शन करतात याबाबत स्वयंसेवकांसोबतच राजकीय वर्तुळातदेखील उत्सुकता होती. मंगळयान मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचे आणि एशियाडमधील विजयी खेळाडूंचे त्यांनी सर्वात अगोदर कौतुक केले.
सामान्य मनुष्याच्या मनात सुखी जीवन जगण्याची कल्पना आहे. याच कल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जनतेने देशात सत्तापरिवर्तन घडवून आणले. पण अजूनही बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. देशात पंतप्रधानांना स्वच्छतेसाठी आवाहन करावे लागते हे दुर्दैव आहे. शासनासमोर विकासाचे मोठे आव्हान आहे. यासाठी जगातील अनुकूल बाबींना शिकून त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. समाजातील शेवटच्या स्तरातील अखेरच्या व्यक्तीचा विकास कसा होईल याचा विचार करून धोरणं तयार करावी लागतील. सरकारने यासाठी सामान्यांसोबत मिळून काम करणाऱ्या संस्था व संघटनांशीदेखील चर्चा करावी असे डॉ.भागवत म्हणाले.
सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महानगर संघचालक डॉ.दिलीप गुप्ता, महानगर सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर तसेच राष्ट्रीय वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
देशाच्या सीमांना धोका
आपल्या भाषणात सरसंघचालक डॉ.भागवत यांनी देशाच्या सीमांना असलेला धोका अधोरेखित केला. दक्षिणेकडील केरळ व तामिळनाडू राज्यांमध्ये जेहादी हालचाली वाढत आहेत. समुद्र किनाऱ्यांवरील रेतीमध्ये मिळणाऱ्या खनिजांची तस्करी सुरूच आहे. पश्चिम बंगाल, बिहार, आसाम येथूनदेखील मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. बंगाल-आसामच्या सीमेवरील लोक पैशांसाठी शेती सोडून घुसखोरांना रेशनकार्ड देण्याचे काम करीत आहेत. स्थानिक स्तरावर मतांच्या राजकारणासाठी या गोष्टींना प्रोत्साहन दिले जात आहे असा आरोप त्यांनी केला. दहशतवाद तसेच नक्षलवादावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे यावरदेखील त्यांनी भर दिला.
एकट्या सरकारचीच जबाबदारी कशी?
देशातून भेदभाव नष्ट होऊन विकास व्हावा याकरिता केवळ एकट्या सरकारचीच जबाबदारी नाही. समाजानेदेखील यात पुढाकार घ्यायला हवा. भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून सुरुवात करायला हवी. शाश्वत मूल्यांच्या आधारावर देशात परिवर्तन व्हायला हवे. कुटुंबातील संस्कार मजबूत करण्यासाठी सरकार नव्हे नागरिकांना प्रयत्न करायला हवे. क्रिकेट, सिनेमा व राजकारण हे विषय सोडून घरच्यांसोबत बोलणे वाढवायला हवे असा सल्ला सरसंघचालकांनी दिला. देशातील सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करायला हवे. सैन्यात अधिकाऱ्यांची कमी आहे अशी ओरड होते. पण देशात तर तरुणांची कमतरता नाही. परंतु पालकांना आपल्या मुलांना केवळ डॉक्टर, इंजिनीअर बनवायचे आहे. मग सैन्यदल, शिक्षण, पत्रकारिता यांसारख्या समाजाच्या इतर क्षेत्रात चांगले लोक पोहोचणार कसे असा प्रश्न डॉ.भागवत यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
सबका सन्मान, सबका स्वीकार
सरसंघचालकांनी आपल्या उद्बोधनात ‘सबका सन्मान, सबका स्वीकार’ हा नारादेखील दिला. जगातील सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी परिवर्तनाच्या मार्गावर असलेल्या आपल्या देशाला वैभवशाली विचारांची परंपरा लाभली आहे. भारतीयांनी कधीही इतर जाती, धर्माचा द्वेष केला नाही. कोणाची मंदिरे, मूर्ती तोडली नाही. कोणाच्याही श्रद्धेवर भारतीयांनी हल्ला केला नाही व तिला मूल्यांकनाच्या तराजूत टाकले नाही. विविधतेचा सन्मान करावा अशी शिकवण देशातील महान पुरुषांनी दिली आहे. त्यामुळे सर्वांचा सन्मान करून एक आदर्श उदाहरण जगासमोर सादर करण्याची वेळ आली आहे. सामाजिक समरसतेसाठी सीम्मोलंघन करा असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.
चिनी वस्तूंचा बहिष्कार करा
सरसंघचालकांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वदेशीचा नारा दिला. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग असायला हवे. आपण चिनी वस्तू वापरतो. चिनी वस्तू वापरल्याने चीनची अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळे प्रत्येकाने चिनी वस्तू खरेदी करणे बंद करायला हवे असे सांगत, स्वदेशीचा नारा दिला. सोबतच देशातून मांस निर्यात बंद व्हावी अशी मागणी त्यांनी केली. गोवंशामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळून शकतो. त्यामुळे गोहत्या बंद झालीच पाहिजे असे ते म्हणाले.

Web Title: People should wait for development and change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.