राज्याची जनता हेच तुमचं कुटुंब अन कुटुंबाचे रक्षण हीच तुमची जबाबदारी : उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:05 PM2021-03-30T15:05:14+5:302021-03-30T15:05:58+5:30
Maharashtra Police Academy : पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत सोहळा
नाशिक : महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे आणि आपणच या कुटुंबाचा भावी आधार आहात. आपण कर्तव्यनिष्ठ राहून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव अधिकाधिक उज्वल करावे आणि या महाराष्ट्राला आपल्या कार्यकर्तृत्वाचा गर्व होईल, अशी कामगिरी करुन जनतेचा विश्वास सार्थ ठरवावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्याने पोलीस दलात दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना उद्देशून केले. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या 118व्या तुकडीतील 668 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी राष्ट्रध्वजासमोर मंगळवारी (दि.30) 'खाकी'ची शपथ घेत निःपक्षपातीपणे देशाच्या संविधानाचा सदैव मान राखत जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना लाईव्ह व्हिडीओद्वारे उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे म्हणाले, जेव्हा खडतर प्रशिक्षण पूर्ण करत आपण एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद नक्कीच मोठा असतो. गेल्यावर्षी या सोहळ्याची रंगत अन दिमाखदार संचलन प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या दिवसाच्या आठवणी आज पुन्हा ताज्या होत आहेत. शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात पहावयास मिळतो. आपल्या रूपाने या राज्याला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिळाले आहेत. सध्या पुन्हा हा महाराष्ट्र कोरोनाच्या न दिसणाऱ्या विषानुरूपी शत्रुसोबत लढा देत आहे. हे आव्हान राज्याच्या पोलीस दलाने मागील वर्षापासून स्वीकारले आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते कोरोनाकाळातही स्वतःची व कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. आपनदेखील आता आजपासून या अद्भुत अशा पोलीस दलाचा एक घटक झाला आहात आणि या दलाची गौरवशाली परंपरा आपणही निष्कलंकपणे पुढे चालवाल, असा आशावादही ठाकरे यांनी यावेळी बाळगला. दरम्यान, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींच्या तुकडीला शपथ दिली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी यांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली. तसेच यावेळी दोर्जे यांनी प्रशिक्षण कालावधीच्या महत्वाच्या टप्प्यांचा थोडक्यात आढावा घेतला. पोलीस उप निरिक्षक शुभांगी शिरगावे यांनी परेड कमांडर म्हणून तुकडीचे नेतृत्व केले.
पीएसआय शुभांगी यांना मानाची 'रिव्हॉल्व्हर'
आपल्या प्रशिक्षण कालावधीत सर्वच टप्प्यात उत्कृष्ट अशी कामगिरी करत लक्ष वेधून घेणाऱ्या पीएसआय शुभांगी चंद्रकांत शिरगावे यांना सर्वोत्तम प्रशिणार्थींचा सन्मान म्हणून उपस्थित वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आली. तसेच पीएसआय सलीम शेख आणि अविनाश वाघमारे यांनाही उत्कृष्ट प्रशिणार्थी म्हणुन यावेळी गौरविण्यात आले.