उत्तर प्रदेशच्या जनतेने स्मशानाच्या बाजूनं मतदान केले- उद्धव ठाकरे
By admin | Published: March 12, 2017 11:27 AM2017-03-12T11:27:36+5:302017-03-12T11:27:36+5:30
उत्तर प्रदेशातील विजय हा नोटाबंदीच्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - भाजपानं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. मात्र महाराष्ट्रात मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं भाजपावर खरमरीत टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने कब्रस्तान विरुद्ध स्मशान या वादात स्मशानाच्या बाजूने मतदान केल्याची टिपण्णीही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील विजय हा नोटाबंदीच्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे. उत्तर प्रदेशातील तुफानाचे पाणी बाजूच्या उत्तराखंड राज्यात पोहोचले व तेथेही भाजपला बहुमत मिळाले, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
गाव तेथे स्मशान हे धोरण राबवले तर काय होईल? ही भीती आम्हाला वाटते. स्मशानांपेक्षा कर्जमाफीची आणि रोजगार, कायदा-सुव्यवस्थेची तेथे गरज आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत आहोत! ते जिंकलेच आहेत. पंतप्रधान मोदी हे उत्तर हिंदुस्थानात मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाले. जाहीर सभांतून त्यांनी लोकांना प्रश्न केला, उत्तर प्रदेशात कब्रस्तान जास्त आहेत. तुम्हाला स्मशान हवे की कब्रस्तान हवे? पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट होता. उत्तर प्रदेशात मुसलमानांची राजवट सुरू आहे. हिंदूंनी ती संपवायला हवी. हिंदू आणि मुसलमान अशी सरळसरळ फाळणी त्यांनी केली. मोदी यांना विजयासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळावेच लागले, पण राममंदिराऐवजी त्यांनी हिंदूंसाठी स्मशाने प्रचारात आणल्याचं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. प्रचंड विजयानंतर तरी रामाचा वनवास संपून अयोध्येत राममंदिर उभे राहील काय, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला विचारण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा चमत्कार आणि करिश्मा कायम आहे. उत्तर प्रदेश हा देशाच्या राजकारणातील गड आहे. दिल्ली राजधानी असली तरी उत्तर प्रदेश हा गडच आहे. गड जिंकल्याचा जल्लोष देशभर सुरू आहे. उत्तर प्रदेशात 325 जागांचे तुफानी बहुमत मिळवून मोदी यांनी विरोधकांना चीत केले आहे. अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी व मायावतींच्या बसपाची साफ धुळधाण झाली आहे. यादवांना 60 जागाही मिळाल्या नाहीत आणि मायावतींना 20 जागांचा टप्पा गाठता आला नाही. उत्तर प्रदेशातील हे विजयी तुफान देशाच्या राजकारणावर परिणाम करणार आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.