फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:26 IST2025-02-24T10:25:46+5:302025-02-24T10:26:56+5:30
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे विधान केले.

फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान
विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान केले, असे विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे ते एका कार्यक्रमात बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमदार सुरेश धस म्हणाले, "भाजपचे आज १३४ जागा आहेत. २२५ आमदारांचे बहुमत आहे. कारण काय, तर हा तमाम महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघतो."
फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून राष्ट्रवादी-शिवसेनेला मतदान
"देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आहे. ईमानदार आहे, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे. या प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्याबरोबर घड्याळही निवडून दिले. आमच्याबरोबर बाणही हाणला. अजिबात मागे पुढे बघितलं नाही. घड्याळाला आमच्या लोकांनी मतदान केलं. एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाणालाही केलं", असे सुरेश धस म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्या सभेचा किस्सा
यावेळी धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सभेचा एक किस्साही सांगितला. धस म्हणाले, "गोपीनाथ मुंडेंची सभा होती. सभेला व्यासपीठावर १३ लोक होते आणि समोर १२ लोक बसलेले होते. गोपीनाथराव म्हणाले, व्यासपीठावरील एकजण खाली जाऊन बसा. म्हणजे ते १३ होतील आणि आपण १२ होऊ. त्या १३ लोकांसमोर गोपीनाथरावांनी असं भाषण केलं, जसं काय समोर १३००० लोक बसले आहेत."