वेगळ्या विदर्भाचे जनआंदोलन
By admin | Published: May 2, 2015 12:52 AM2015-05-02T00:52:41+5:302015-05-02T00:52:41+5:30
संपूर्ण राज्यभरात शुक्रवारी महाराष्ट्र दिवस साजरा होत असताना नागपूरसह संपूर्ण विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा विदर्भवाद्यांनी दिला.
नागपूर : संपूर्ण राज्यभरात शुक्रवारी महाराष्ट्र दिवस साजरा होत असताना नागपूरसह संपूर्ण विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा विदर्भवाद्यांनी दिला. नागपुरात विविध ठिकाणी धरणे, निदर्शने, मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत ध्वजारोहण केले. तर व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. भारिप बहुजन महासंघाने मोर्चा काढला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तृतीयपंथीय सुद्धा मैदानात उतरले होते. त्यांनी व्हेरायटी चौकात रास्ता रोको करून लक्ष वेधले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी व्हेरायटी चौकात तासभर नारे निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपा नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. परंतु पोलिसांनी त्यापूर्वीच पुतळा ताब्यात घेतला आणि आंदोलकांना अटक केली. शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता.
(प्रतिनिधी)