बारावी फेरपरीक्षेच्या निकालाचा टक्का घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:28 PM2018-08-24T16:28:30+5:302018-08-24T16:29:01+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला.
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. परीक्षा दिलेल्या १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच एकूण २२. ६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का घसरला आहे.
बारावीच्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी देण्यासाठी १७ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान राज्यभरात फेरपरीक्षा घेण्यात आली होती. राज्यात परीक्षेसाठी बसलेल्या एकूण १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २२. ६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जुलै २०१७ मधील फेरपरीक्षेची टक्केवारी २४. ९६ आणि २०१६ मध्ये २७.० ३ टक्के होती. लातूर विभागातील सर्वाधिक म्हणजेच ३१. ४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर मुंबईचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजे १९. २७ इतका लागला आहे.