सत्तेच्या समीकरणांचा वेध
By Admin | Published: February 27, 2017 02:52 AM2017-02-27T02:52:21+5:302017-02-27T02:52:21+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे.
आविष्कार देसाई,
अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. सर्व तर्क-वितर्कांना खोटे ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे याच अध्यक्षपदी का विराजमान होतील. तसेच सत्ता उपभोगण्याचा शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे या दोन धुरंदर नेत्यांची पुढील राजकीय गणित काय असू शकतील? याचा हा घेतलेला वेध.
राजकारण जरी क्षणाक्षणाला बदलत असले, तरी पक्षाचे नेतृत्व नेहमीच सत्तेचे व्हिजन डोळ््यासमोर ठेवून वाटचाल करीत असतात. ध्येयप्राप्तीसाठी ‘थोडे द्यायचे आणि थोडे घ्यायचे’ या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी केली जाते. आजच्या राजकारणात सत्ताप्राप्ती हेच अंतिम ध्येय असल्याने राजकारणातील उलट-सुलट युत्या, आघाड्या यांच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहे.
रायगडच्या राजकारणातील शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हे धुरंदर नेते आहेत. त्यांच्याच व्यूहरचनेतून नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. शेकापने या निवडणुकीत सर्वांचाच सफाया करत २३ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकून सत्तेच ध्येय प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा या निवडणुकीत शेकापने चार जागा अधिक जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ८ जागांनी पिछेहाट झाली. दोघांच्या युतीचा फायदा हा शेकापला झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तोटा झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट का झाली याचे आत्मचिंतन तटकरे यांना करावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना-काँग्रेस-भाजपा यांची आघाडी झाली होती. शिवसेनेला १८ तर, काँग्रेस, भाजपाला प्रत्येकी तीन जागा प्राप्त झाल्या. शिवसेनेच्या चार जागा वाढल्या, तर भाजपाच्या दोन, तर काँग्रेसच्या चार जागा कमी झाल्या. आघाडी केल्याचा तोटा काँग्रेसला झाला आणि फायदा मात्र शिवसेना, भाजपाला झाला हे निकालवरून दिसून येते.
>आदिती या २०१९ सालापर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान राहतील. त्यानंतर २०१९ साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना शेकापच्या मदतीने निवडून आणायचे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनाही शेकापच्या ताकदीने लोकसभेत विराजमान करायचे. तर शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आल्यावर त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पाठवायचे, असे राजकीय समिकरण रायगडच्या राजकारणात सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून घडेल, असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे.
>सर्व समिकरणे खरी ठरली, तर रायगडच्या राजकारणात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहील. मात्र, विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा ठरणारी आहे. यासाठी त्यांनी आधीच आपापली राजकीय समिकरणे पडताळून पुढील राजकारणाची वाटचाल केल्यास त्यांना शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आव्हान उभे करता येईल.
शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून ३५ जागा आल्या आहेत. त्यामुळे तेच सत्तेमध्ये बसणार आहेत. सर्व तर्क-वितर्कांना खोटे ठरवत आदिती तटकरे याच अध्यक्षपदी विराजमान होतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांना कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून आणण्यास पुरेपूर मदत केली होती. त्याचप्रमाणे शेकापचे आस्वाद पाटील यांचा जिल्हा परिषद मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना निवडणूक लढविण्यात अडचण निर्माण झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व असलेला रोहे तालुक्यातील खारगाव मतदार संघ आस्वाद यांना सोडण्यात आला. त्यांना तेथून प्रचंड मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडूनही आणले.
हा सर्व समझोता केवळ आदिती तटकरे यांनाच अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठीच होता,
असे आता स्पष्ट होत आहे.