तमाशा कलावंत उपेक्षितच
By admin | Published: February 22, 2016 12:31 AM2016-02-22T00:31:43+5:302016-02-22T00:31:43+5:30
महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेली लोककला जपण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाशी येथे आयोजित
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेली लोककला जपण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाशी येथे आयोजित तमाशा महोत्सवातील वास्तविक चित्र पाहता या ठिकाणी लोकनाट्य सादर करण्यासाठी परगावाहून आलेले तमाशा फड तसेच त्यातील लोककलावंतांना साध्या प्राथमिक सुविधा पुरविण्यात सांस्कृतिक विभाग अपयशी ठरल्याचे दिसून आले.
वाशीत भरविण्यात आलेल्या तीन दिवसांच्या महोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पाच तमाशा फड सहभागी झाले होते. या ठिकाणी कलावंतांसाठी प्रसाधनगृहाचीही सोय करण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर तीन दिवसांच्या मुक्कामात फडातील लहान मुले आणि वृध्द कलावंतांना कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाहीत. तसेच कलावंतांना कपडे बदलण्यासाठी कापडी तंबूत सोय करण्यात आली होती. एकूणच लोककला आणि कलावंत टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून सुरू असलेले प्रयत्न तकलादू वाटले.
प्रत्येक वर्षी महोत्सव भरवून सांस्कृतिक विभागाने काय साध्य केले असा संतप्त सवाल या कलावंतांतून उपस्थित होवू लागला आहे. तमाशा व त्यातील कलावंत आजही उपेक्षितच जीणे जगत आहेत. त्यांच्या वाट्याला येणारी ही उपेक्षा कधी संपणार, असा सवाल वाशीतील या महोत्सवाच्या माध्यमातून उपस्थित झाला आहे. क्रीडा, नृत्य, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रमावर लाखोंची उधळण केली जाते. मग तमाशा व त्यातील कलावंतच दुर्लक्षित का? महोत्सव असेल तेव्हा म्हणजे वर्षातून एकदाच या लोककलावंतांची शासनाला आठवण येते. त्यातील मिळणारे मानधनही अत्यंत अपुरे असते. विविध शासकीय योजना, उपक्रमांवर भरमसाट पैसा खर्च करणाऱ्या सरकारला लोककलावंतांसाठी खर्चाचे गणित कधीच अचूक बसत नाही. सतत फिरस्तीवर असलेल्या या कलावंतांच्या पोराबाळांचे शिक्षण तर दूरच पण साधे दोन वेळची भूक भागविणेही अवघड असते. प्रत्येक फडात १५ हून अधिक महिलांचा समावेश असतो, या महिलांची सुरक्षेची जबाबदारी मात्र कोणी घ्यावी?
प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करणाऱ्या या महिलावर्गांच्या तान्ह्या बाळांना मात्र थंडीत कुडकुडत झोपावे लागते. अनेकदा या कलावंतांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागते. त्यांच्या मुलांच्या पोषण आहाराविषयी ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत.
अनेकदा कला सादर करायला जाताना या महिला आपल्या बाळांना दोरखंडाने बांधून ठेवतात. आधुनिक नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात हे चित्र प्रकर्षाने पाहावयास मिळाले.
एका गावाहून दुसऱ्या गावी असा नेहमीचा प्रवास करून प्रत्येक गावोगावी जाऊन ग्रामीण लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या लोककलावंतांच्या आरोग्याच्या बाबतीतही शासन कसल्याही ठोस उपाययोजना राबवित नाही. कार्यक्रमाच्या वेळी आजारपण आले तरीदेखील ते दुखणे अंगावरच घेऊन नृत्य सादर करावे लागते अशी व्यथा नृत्यांगना सुरेखा सातारकर यांनी मांडली.
राज्य सरकारचा दुटप्पीपणा
वाशीत काहीच दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या वतीने आयोजित क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. प्रकाशयोजना, ध्वनी, खेळाडू, कलाकारांसाठी विशेष सोय, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे पहायला मिळाले मात्र त्यानंतर आयोजित तमाशा महोत्सवाला मात्र कसलीच सोय नसल्याने कलेमध्ये आणि कलावंतांमध्ये असा फरक का? असा प्रश्न उभा राहतो.
रात्रीच्या वेळचे कार्यक्रम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा तसेच या फडातील वृध्द व्यक्तींना वाढत्या वयाच्या होणाऱ्या समस्यांकरिता हातात पैसे देखील शिल्लक राहत नाही. कालावंतांना हक्काचे घर नसल्याने उघड्यावर संसार थाटावा लागतो तर मुलांना मात्र शिक्षणापासून वंचित राहावे लागते.