कामगार चळवळीचे एक पर्व संपले
By Admin | Published: September 2, 2016 01:42 AM2016-09-02T01:42:54+5:302016-09-02T01:42:54+5:30
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे एक पर्व संपले आहे. हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी करणाऱ्या कामगारापासून देशातील विविध क्षेत्रांतील कामगार
- शंकर साळवी
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे एक पर्व संपले आहे. हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी करणाऱ्या कामगारापासून देशातील विविध क्षेत्रांतील कामगार संघटनेच्या नेत्यापर्यंतच्या सर्व भूमिका राव यांनी यथायोग्य पार पाडल्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या जाण्याने केवळ एक कामगार नेता नव्हे, तर एका चळवळीचा अंत झाला आहे.
१९६७ साली हिंदुस्थान लिव्हरमध्ये काम करणाऱ्या राव यांना कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी सोबत घेतले. फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात केलेल्या राव यांनी, कामगारांत स्वत:ची वेगळी छाप सोडली होती. त्यांच्या कामाने खूश होत फर्नांडिस यांनी लोकसभा निवडणूक लढताना राव यांच्यावर प्रचार प्रमुखाची जबाबदारी सोपवली. निवडणुकीनंतर मुंबईतील कामगार चळवळीचा वारसा फर्नांडिस यांनी राव यांच्यावर सोपवला. त्या वेळी राव यांच्यामुळे चळवळ कमकुवत होईल, अशी भीती बहुतेकांनी व्यक्त केली. मात्र, राव यांनी नेतृत्व हाती घेतले आणि संघटनेच्या सभासदांत तिपटीने वाढ झाली. त्यामुळे आपोआपच सर्वच विरोधकांना चोख उत्तर मिळाले.
सुरुवातीच्या काळात वेगवेगळ््या कामगारांसाठी राव यांनी आंदोलनाला सुरुवात केली. १९८२ साली बाळासाहेब दंडवते यांचा मृत्यू झाला. त्या वेळी महापालिका कर्मचाऱ्यांचे नेतृत्व कोणी करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मधू जोशी या नेतृत्वासाठी उत्सुक असल्याचे समजले. मात्र, कामगार आणि पदाधिकाऱ्यांही भरघोस मतदान करून ही जबाबदारी राव यांच्यावर सोपवली. त्या वेळी म्युनिसिपल मजदूर युनियनमधील सभासदांची संख्या २० हजारांहून कमी होती. ती राव यांनी ६० हजारांवर नेऊन ठेवली. त्यांच्या चळवळीची पद्धत पाहून बेस्ट वर्कर्स युनियन आणि आॅल इंडिया को. आॅ. बँकेवर त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्या वेळी राव यांनी बेस्टच्या प्रत्येक डेपो व गेटवर घेतलेल्या आक्रमक बैठका आणि जाहीर सभांमुळे पूर्ण बँक आणि युनियनचा ताबा राव यांच्याकडे आला. त्यांच्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कामगार चळवळ नावारूपाला आली.
१९७१ साली कापड बाजारातील गुमास्ता कामगारांची कैफियत राव यांच्या कानावर आली. येथील ३५ हजार कामगारांना नियमानुसार पगारवाढ आणि इतर सेवा मिळाव्यात, म्हणून राव यांनी गुमास्ता कामगारांची युनियन सुरू केली. किमान १० कामगारांसाठी मिळणारी ग्रॅच्युईटी राव यांनी दिलेल्या ऐतिहासिक लढ्यामुळे येथील एका कामगारामागे सुरू झाली. दरम्यान, टॅक्सी आणि आॅटोरिक्षांना कोणीही वाली नव्हता. या वाहन चालक-मालकांना एकत्र आणण्यात राव यांनी मोलाची भूमिका बजावली.
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील १५ लाख चालक-मालकांना एकत्र आणून राव यांनी नव्या युनियनची वज्रमूठ बांधली. राव यांच्यावरील विश्वासामुळेच बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सी चालक एका हाकेवर मुंबईसह राज्यात बंद करत होते. त्यामुळे भाडेवाढीची वेळ आली की, चालक-मालक आणि शासनातील दुवा म्हणून राव काम करत होते. फेरीवाल्यांसाठीचा लढा केंद्रीय कायद्याच्या स्वरूपात आजन्म लक्षात ठेवला जाईल.
(लेखक ज्येष्ठ कामगार नेते आणि शरद राव यांचे निकटवर्तीय)