घातक नायलॉन मांजावर कायमची बंदी
By Admin | Published: July 27, 2016 07:52 PM2016-07-27T19:52:36+5:302016-07-27T19:52:36+5:30
पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई यांनी १८ जून २०१६ रोजी पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत अधिसूचना जारी करून नायलॉन मांजावर कायमची बंदी आणली
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २७ : पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई यांनी १८ जून २०१६ रोजी पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत अधिसूचना जारी करून नायलॉन मांजावर कायमची बंदी आणली आहे. अधिसूचनेनुसार यापुढे नायलॉन मांजाचा साठा, विक्री व वापर करता येणार नाही. नायलॉन मांजा विविध बाबतीत प्रचंड घातक ठरत असल्याचे आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून या अधिसूचनेची माहिती दिली.
नायलॉन मांजावर कायमची बंदी आणण्यात आल्यामुळे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी संबंधित रिट याचिका निकाली काढली. या निर्णयामुळे याचिका निष्प्रभ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी शासनाने नायलॉन मांजाचा साठा, विक्री व वापर करण्यावर केवळ मकर संक्रांती काळापुरती बंदी आणली होती. परंतु, मकर संक्रांतीचा काळ कोठून कु ठपर्यंत ग्राह्य धरायचा हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. परिणामी रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने ही याचिका दाखल केली होती.