सिंहस्थासाठी कायमस्वरूपी जागा
By admin | Published: July 14, 2015 11:50 PM2015-07-14T23:50:58+5:302015-07-14T23:50:58+5:30
कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा अधिग्रहित करून, जागा मालकांना त्याचा योग्य मोबदलाही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नाशिक : कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा अधिग्रहित करून, जागा मालकांना त्याचा योग्य मोबदलाही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंगळवारपासून सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नाशिक वगळता अन्यत्र ठिकाणी चार हजार एकर जागा कुंभमेळ्यासाठी उपलब्ध असते, नाशिकला मात्र सव्वातीनशे एकरच जमीन उपलब्ध होत असते. त्यातच पावसाळ्यात कुंभमेळा येत असल्याने मोठे आव्हान असते. शासनाने साधुग्रामसाठी जागा अधिग्रहित करण्याबरोबरच साडेतीनशे मीटर लांबीचे दहा घाट बांधल्याने गोदावरीचे पावित्र्य राखण्यास मदत तर होईलच; परंतु लाखो भाविकांना स्रानासाठी त्याचा उफयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा सर्वांच्या सहकार्याने हरित कुंभ संकल्पना यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ््यासाठी निधीची कमतरता राहणार नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी सांगितले. अध्यात्म व पूर्वजांच्या आशीर्वादाच्या बळावर साजरा होणाऱ्या कुंभमेळ्याद्वारे समाजातील विविध अडचणी व समस्या सोडवण्याची ताकद मिळेल, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, जगद्गुरू श्री रामानंदाचार्य हंसदेवाचार्य, जैन साध्वी मधुसुधाजी, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
काश्मीरवर चर्चेचा प्रश्नच नाही - राजनाथसिंह
त्र्यंबकेश्वर : भारतीय संस्कृती ही विश्वाला जोडणारी असून, भारतीय संस्कृतीने आजवर मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारसी सर्वच समुदायांचा आदर दिला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. त्यावर कोणाशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. येथील कुशावर्ताजवळ सिंहस्थ महापर्वाच्या ध्वजारोहणानंतर ते म्हणाले, भारत विश्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. प्रत्येक देशाची विदेशनीती ठरलेली असते. त्यानुसार शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध असावेत, हीच भारताची इच्छा आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. परंतु पुन्हा वाईट अनुभव आल्यास भारत त्याला सडेतोड उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.
ब्रह्मनादात फडकली धर्मध्वजा!
प्रभातसमयी ६ वाजून १६ मिनिटांनी सिंह राशीत गुरू आणि रवि प्रवेशकर्ते झाले अन् गोदातटी उभारलेल्या ४० फुटी ध्वजस्तंभावर सदाचार, सत्प्रवृत्ती, सद्वर्तन आणि त्याग-शौर्याची प्रतीक असलेली केशरी धर्मध्वजा ढोल-नगारे, शंखध्वनीच्या ब्रह्मनादात दिमाखात फडकली.
एकीकडे धर्मध्वजा स्थापित होत असताना श्रीरामनाम आणि श्रीपवनसुत हनुमानाचा जयघोष करत श्रद्धाळूंच्या गर्दीने काठोकाठ भरलेला गोदाघाट आनंदसोहळ्यात भाव-भक्तीरसाने न्हाऊन निघाला. धर्मध्वजारोहण सोहळ््यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
असा आहे धर्मध्वज!
रामकुंडाजवळ गोदावरी मंदिराजवळ पाचशे किलो पितळी धातूपासून बनविण्यात आलेला ४० फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावरील धर्मध्वज केशरी रंगात असून, त्यावर एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला अमृतकलश आणि ॐ आणि श्री हे शुभचिन्ह आहे. १५ बाय ४.५ फूट असलेला हा धर्मध्वज नाशिकचे दुर्गेश खैरनार यांनी तयार केला आहे. हा धर्मध्वज ११ आॅगस्ट २०१६ पर्यंत फडकणार आहे.
कुंभमेळ्यासाठी रेल्वेची २५ कोटींची कामे
मुंबई : नाशिकमध्ये कुंभमेळ्यास सुरुवात झाली असून, यासाठी मध्य रेल्वेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशभरातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक रोड स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहे, जादा आरक्षण खिडक्या यांसारख्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी मध्य रेल्वेकडून २५ कोटी ८ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी विशेष जादा गाड्याही सोडण्यात आल्या आहेत.
शाही स्नानासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल. हे पाहता मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. नाशिक रोड स्थानकात चौथा अतिरिक्त प्लॅटफॉर्म तयार करतानाच रॅम्पही बनवण्यात आला आहे. सध्या स्थानकात १७१ पाण्याचे नळ असून, आणखी ६0 नळ याव्यतिरिक्त ६0 स्वच्छतागृहे, २२ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू केल्या जाणार आहेत.