शेतकऱ्यांना हवी कायमस्वरूपी टोलमुक्ती
By admin | Published: July 16, 2017 01:04 AM2017-07-16T01:04:52+5:302017-07-16T01:04:52+5:30
तुम्ही स्वेच्छेने तुमची जमीन देताय ना, शासनाचा तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना आणि जमिनीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत ना? असे प्रश्न विचारून
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तुम्ही स्वेच्छेने तुमची जमीन देताय ना, शासनाचा तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना आणि जमिनीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत ना? असे प्रश्न विचारून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरेदीखत स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची शनिवारी साक्ष काढली. मात्र, त्यातीलच एका शेतकऱ्याने आमच्या जमिनी या प्रकल्पासाठी आम्ही देत आहोत, तर आम्हा शेतकऱ्यांना जिवंत असेपर्यंत या महामार्गावर टोलमुक्ती मिळेल ना, असा प्रश्न थेट पालकमंत्र्यांना करताच सगळ्यांनी आपले कान त्यांच्या उत्तरासाठी टवकारले. तुमची मागणी योग्य असून तुमच्यासाठी टोलमुक्ती देण्याकरिता विचार करू, असे आश्वासन दिले.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या, त्यांना शिंदे यांच्या हस्ते खरेदीखत देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. समृद्धी महामार्गाला शिवसेनापक्षप्रमुख विरोध करत असताना दुसरीकडे शिंदे खरेदीखत देत असलेल्या या विसंगतीवर माध्यमांनी बोट ठेवल्याने शुक्रवारपासून या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून वेळेत दोनतीन वेळा बदल करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी उद्धव ठाकरे व शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिंदे नियोजन भवनात पोहोचताच क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या हस्ते तीनही शेतकऱ्यांना खरेदीखत देण्यात आले. तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आणि तुम्ही जमिनी स्वत:हून देताय ना? असे प्रश्न शिंदे यांनी शेतकऱ्यांना विचारले. आमच्यावर कोणाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संंबंधित नाहीत. चांगल्या कामासाठी जमीन जातेय म्हणून आम्ही दिली. उलट, अपेक्षेपेक्षा शासनाने आम्हाला जास्त रक्कम दिली आहे, अशी भावना शेतकऱ्यांंच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गणेश राऊत यांच्या मुखातून वदवून घेण्यात आली.
काही शेतकऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे बँकेकडून मोबाइलवर आलेले एसएमएसही शिंदे यांना दाखवले. आधी शहापुरात नियोजित असलेला कार्यक्रम तेथे आंदोलन होण्याच्या भीतीने ठाण्यात घेतला का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुंबईतील रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमाला सकाळी हजर राहायचे असल्याने शहापूर येथील कार्यक्रम रद्द केला, असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पाविरुद्ध जे आंदोलन करीत आहेत, त्यांची तेथे इंचभरही जमीन नाही. काही जण शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू पाहत आहेत. हे प्रकार समोर आणले पाहिजे, या आरोपाचा शिंदे यांनी पुनरुच्चार केला. अशा आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची वेळ आली तर नक्कीच करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी दिले. या वेळी उपस्थित असलेले शहापूर तालुक्यातील अंदाड गावाचे अध्यक्ष शरद मोगरे यांनी आपल्या गावाने १०० टक्के संमतीपत्र दिले असून लवकरत नोंदणीप्रक्रिया चालू होणार असल्याचे सांगितले.
आणखी ३२३ शेतकऱ्यांकडून संमतीपत्र
शासनाने गणपत धामणे यांची ७० गुंठे जमीन खरेदी केली असून ७२ लाख ९१ हजार ७२४ रुपये, दौलत धानके यांना ८५ गुंठे जमिनीसाठी ७९ लाख७ हजार २७० रु पये तर गणेश राऊत यांच्या ४३ गुंठे जमिनीसाठी ३ लाख १६ हजार ३०८ रु पये इतका मोबदला त्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामागोमाग ठाण्यातील कसारा, वाशाळा, खर्डी, रातांधले, हिव, खुटघर, रास, अंदाड या गावांकडून १०० टक्के संमतीपत्रे आली असून येथील शेतकऱ्यांची संख्या ३२३ इतकी आहे.
५२ लाख ते ५ कोटी रु पये प्रतिहेक्टर दर
शहापूर तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या २८ पैकी २३ गावांतील जमीनविक्र ीचे दर निश्चित करण्यात आले असून ही किंमत ५२ लाख ते ५ कोटी रु पये इतकी प्रतिहेक्टर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी दिली.