सीबीआय चौकशीला परवानगी
By admin | Published: January 3, 2017 04:47 AM2017-01-03T04:47:59+5:302017-01-03T04:47:59+5:30
तुळजापूर देवस्थान मंदिरातील दानपेटी गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा मार्ग मोकळा झाला. हिंदू जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर सुनावणी
औरंगाबाद : तुळजापूर देवस्थान मंदिरातील दानपेटी गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा मार्ग मोकळा झाला. हिंदू जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी या चौकशीला परवानगी दिली.
तुळजापूर देवस्थान मंदिराच्या व्यवस्थापन समितीने दानपेटीच्या लिलावात घोटाळा केला होता. गुत्तेदारांनी दान कमी येत असल्याचे दाखवून लिलावामध्ये कमी दराने दानपेट्या घेतल्या. १९९१ ते २००८ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दानपेटीत गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले. व्यवस्थापन समितीमध्ये उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
हिंदू जनजागरण समितीने सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती आपल्या याचिकेत केली होती. यावर प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने परवानगी दिली असल्याचे हिंदू जनजागरण समितीचे वकील सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.
याविषयी सीबीआयला नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. याचिकेवर १२ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)