ग्रा.पं.ची बेकायदा बांधकामाला परवानगी

By Admin | Published: June 9, 2017 02:50 AM2017-06-09T02:50:39+5:302017-06-09T02:50:39+5:30

कोळीवली गावात एका नागरिकाला कुंपणभिंत बांधण्याकरिता नियम धाब्यावर बसवून ना हरकत दिल्याबद्दल ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात यावी

Permission for illegal construction of Gram Panchayat | ग्रा.पं.ची बेकायदा बांधकामाला परवानगी

ग्रा.पं.ची बेकायदा बांधकामाला परवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : वाकस ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीने कोळीवली गावात एका नागरिकाला कुंपणभिंत बांधण्याकरिता नियम धाब्यावर बसवून ना हरकत दिल्याबद्दल ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोळीवली ग्रामस्थ मच्छिंद्र मसणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोळीवली गावातील एका कुंपणभिंतीच्या बांधकामास वाकस ग्रामपंचायतीने कुठलीही शहानिशा न करता नाहरकत दाखला दिला आहे. या कंपाउंडच्या एका भिंतीचे बांधकाम रायगड जिल्हा परिषदेच्या कोळीवली जोडमार्ग क्र .२६ या रस्त्यावर करण्यात आले असल्याचे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते. हे बांधकाम बेकायदा असतानाही ग्रामपंचायतीने त्यास कायदेशीर परवानगी दिल्याबद्दल मसणे यांनी तक्र ार केली आहे. हे नाहरकत देताना प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याचीदेखील तसदी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नाही असे तक्र ारदारांचे म्हणणे आहे.
ही जागा कोळीवली गाव हद्दीतील गावठाण जागा असून गोपाळ भिवा मिसाळ यांनी मच्छिंद्र मसणे यांचा वहिवाटीचा गाडी येण्या-जाण्याचा रस्ता बंद करून या कंपाउंडची दुसरी भिंत बांधली आहे. याबाबत मसणे यांनी लेखी हरकत नोंदवली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून वाकस ग्रामपंचायतीने बांधकामास परवानगी दिली आहे. हे बांधकाम नाहरकतबाबत कुठल्याही प्रकारची पूर्ण माहिती ग्रामपंचायत देत नाही. अर्जदारांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जांची उपेक्षा ग्रामपंचायतीने केली असून अर्जदार मसणे यांना माहिती देण्यास ग्रामसेवक बागुल हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.
याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्र ार दाखल करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी या प्रकरणाबाबत कर्जत पंचायत समितीने यावर नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त काहीच कारवाई केलेली नाही. हा रस्ता कोळीवली गावच्या नकाशात नसल्याचे कारण देऊन हे प्रकरण निकालात काढावे असा उर्मट सल्ला ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी कर्जत यांना दिला आहे. यामुळे व्यथित तक्र ारदार मच्छिंद्र मसणे यांनी ग्रामपंचायत प्रशासन आपल्या कर्तव्याची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा करीत असल्याची तक्र ार मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे. इतकेच नव्हे तर वाकस सरपंच व सदस्य यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदींचे पालन करण्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याबद्दल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मच्छिंद्र मसणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
>सुशिक्षित सरपंच, अशिक्षित कारभार...
कर्जत तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिला सरपंचपदी विराजमान आहेत. प्रत्यक्षात मात्र या सौभाग्यवती सरपंचांच्या वतीने त्यांचे सौभाग्यच हा गावगाडा चालवत आहेत. अशा ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच या केवळ सह्याजीराव असतात.
ग्रामसभा व मासिक सभा उपस्थिती दर्शवणे व कागदपत्रांवर मुकाट सह्या करणे इतकीच त्यांची भूमिका असते. असाच काहीसा प्रकार वाकस ग्रामपंचायतीमध्ये आढळून आला.
सदर प्रकरणी अधिक माहितीकरिता वाकस ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा बबन धुळे यांच्याशी वारंवार संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्कहोऊ शकला नाही. याबाबत ग्रामसेवक दिगंबर बागुल यांच्याकडे विचारणा केली असता ग्रामपंचायतीतील कारभार सरपंच यांचे पती बबन धुळे हेच पाहत असल्याचे समजले.
विद्यमान सरपंच अनुराधा धुळे या उच्चशिक्षित असून त्या काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होत्या.असे असतानाही वाकस ग्रामपंचायतीतील कारभार पती पाहत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय वाकस ग्रामपंचायतीचे सरपंच बबन धुळे हेच असल्याची चर्चा परिसरात आहे.
बांधकाम ना हरकत दाखला देताना जागेची पाहणी केली नाही, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगीही घेतली नाही. या संदर्भात सरपंच व सदस्य यांच्याबरोबर अनेक वेळा बोलणे झाले आहे.परंतु या बांधकामाविषयी चर्चा करायची आहे असे ते अनेक वेळा बोलले आहेत. परंतु ते त्याच्यावर असा ठोस निर्णय घेत नाहीत. तसेच सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात फक्त बैठक असल्यावर येत असल्याने यावर फारशी चर्चा होत नाही. परंतु यावर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.
- दिगंबर बागुल, ग्रामसेवक, वाकस
कोळीवली जोडमार्ग क्र . २६ या रस्त्यावर अनधिकृत कुंपणभिंत बांधण्यात आल्याबाबतची लेखी तक्र ार आमच्याकडे आली असून यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतीला दोन दिवसांत नोटीस जारी करण्यात येईल.
- के. के. केदारे, शाखा अभियंता,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कर्जत
या वॉल कंपाउंडमुळे माझा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. माझी गाडी मला उन्हा-पावसात रस्त्यावर ठेवावी लागत आहे. या बांधकामाला हरकत घेऊनही ग्रामपंचायतीने परवानगी दिली. यामागे राजकीय हितसंबंध हेच एकमेव कारण आहे. ग्रामपंचायत अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत आहे. जिल्हा प्रशासन मला न्याय देईल ही अपेक्षा.
-मच्छिंद्र मसणे, तक्र ारदार, कोळीवली

Web Title: Permission for illegal construction of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.