१२५ विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रवेशासाठी संमतीपत्र
By Admin | Published: November 10, 2016 12:15 AM2016-11-10T00:15:06+5:302016-11-10T00:15:06+5:30
पाळा आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 10 - पाळा आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आदिवासी विभागाचे विविध पथके विद्यार्थ्यांच्या गावात पोहचले असून १२५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी समायोजनाबाबत संमतीपत्र दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पाळा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थींनींवरील अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांसह ८ जणांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आश्रम शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीच्या सुट्टया असल्याने सर्व विद्यार्थी आपल्या मुळ गावी गेले आहेत. त्यामुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विविध पथके तयार करुन विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पाठविले आहेत. या शाळेमध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा, जळगाव आणि अमरावती या पाच जिल्ह्यामधील ५२ गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे संबंधित ५२ गावात पथके पाठविण्यात आली आहेत. अद्याप पर्यंत १२५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश दुसऱ्या शाळेंमध्ये करण्यासाठी संमतीपत्र दिले आहेत. १५ नोव्हेंबर पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन विविध शाळांमध्ये पालक व विद्यार्थ्यांच्या समंतीनुसार केले जाईल,अशी माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी सोनोने यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांची कागदपत्रे पोलीसांच्या ताब्यात
पाळा येथील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. या शाळेमध्ये प्रवेश दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सत्यता पडताळण्यासोबतच विद्यार्थ्यांची नावे व इतर माहिती तसेच शाळेमधील तपासासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. या शाळेमध्ये बोगस विद्यार्थी असण्याची शक्यता असून आदिवासी विभागाकडून याबाबीची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान निवासी आश्रम शाळेवर चार पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
समुपदेशनासाठी कार्यक्रम तयार करा - नागरगोजे
पाळा येथील आश्रम शाळेच्या पिडीत विद्यार्थीनीसोबतच सर्व विद्यार्थीनींचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त डॉ.के.एम.नागरगोजे यांनी बुधवारी दिले आहेत.
या आश्रम शाळेतील विद्यार्थीनींचा वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश केल्या जाणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व शाळांमध्ये जावून विद्यार्थीनींची माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे त्यांचे समुपदेशन करावे. यासोबतच पिडीत विद्यार्थीनींची प्रत्येक महिन्याला भेट घ्यावी, असेही नागरगोजे यांनी बालकल्याण समितीला सांगितले आहे. दुसऱ्या पिडीत विद्यार्थीनीला मनोधैर्य योजनेतून मदत देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपआयुक्त बोरखेडे, महिला व बालविकास अधिकारी पी.एस. एंडोले, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष मंगला सपकाळ, प्रेमलता सोनोने आदी उपस्थित होते.
संस्थाचालक संघटनेची आश्रम शाळेला भेट
पाळा येथील निवासी आश्रम शाळेला विभागीय संस्थाचालक संघटनेने बुधवारी भेट दिली. घडलेल्या घटनेबाबत पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी विभागीय अध्यक्ष किरणराव सरनाईक तसेच सोमटकर, भाऊसाहेब काळे, धनंजय रोठे, अशोकराव कांबळे, आशुतोष लांडे आदिंची उपस्थिती होती.