कोरोना नियंत्रणानंतरच चित्रीकरणास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:54 AM2021-06-07T08:54:09+5:302021-06-07T08:54:47+5:30
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लावावा लागला.
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी होती. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी सावधानता व खबरदारी बाळगायची आहे. नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन करायचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लावावा लागला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र, आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाईल. ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे, तेथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण ४० टक्क्यांहून अधिक आहेत ते सर्व जण लेव्हल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाचे चित्रीकरण केले जाऊ शकते. परंतु, त्यासाठी
काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायो बबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करणे आवश्यक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा,
असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून शासन घेईल त्या निर्णयांना एकजुटीने पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले.
या बैठकीला टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के. माधवन,
मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध
भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, जे. डी. मजेठिया, अमित
बहेल, झी समूहाचे पुनित
गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, सतीश राजवाडे, नीलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय
केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे,
नितीन वैद्य, अशोक पंडित, गौरव बॅनर्जी, मधू भोजवानी, राहुल जोशी उपस्थित होते.
स्तर १ व स्तर २ जिल्ह्यांमध्ये चित्रीकरणासाठी पाच वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र १२ तासांची शिफ्ट असल्याने आम्ही चित्रीकरणासाठी आठ वाजेपर्यंत परवानगी मागितली आहे. सकाळी लवकर चित्रीकरण करून ते या वेळेत संपविता येईल. स्थानिक प्रशासनाला वेळ वाढविण्याचे अधिकार आहेत. वेळेचा प्रश्न लवकर निकालात निघेल, असा विश्वास आहे.
- नितीन वैद्य,
चित्रपट-मालिकांचे निर्माते