जनावरांच्या वाहतुकीसाठी लागणार परवानगी
By Admin | Published: March 27, 2016 01:17 AM2016-03-27T01:17:19+5:302016-03-27T01:17:19+5:30
चारचाकी वाहनातून जनावरांची वाहतूक करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने परवानगी सक्तीची केली आहे. जनावरे प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का
- ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
चारचाकी वाहनातून जनावरांची वाहतूक करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने परवानगी सक्तीची केली आहे. जनावरे प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का, ती वाहनात उभी राहू शकतील का, याची तपासणी होऊन तशी परवानगी पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागणार आहे.
पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी नगर जिल्ह्यातून प्रवास करताना त्यांना एका ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी तातडीने पशुसंवर्धन विभागाला संबंधीत वाहनात असणाऱ्या जनावरांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भारत राठोड यांनी पोलिसांच्या मदतीने ते वाहन अडवून माहिती घेतली असता ही जनावरे ऊस तोडणी कामगारांची असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे.
यामुळे आता पशुसंवर्धन विभागाने जनावरांची वाहतूक करताना वाहतूक अधिनियम १९५८ मधील नियम ४७ अन्वये ते जनावर वाहतूक करण्यास सक्षम आहे की नाही, ते वाहतुकीदरम्यान चार ते पाच तास उभे राहू शकते की नाही, त्याचे आरोग्य निरोगी आहे का, याबाबतचा दाखला तालुका पशुधन अधिकाऱ्यांकडून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद केले.
जनावरांची वाहतूक करताना पशुसंवर्धन विभागाची परवानगी आवश्यक आहे. हा नियम पूर्वीपासून सर्वांना लागू आहे. पशुसंवर्धन विभागाची परवानगी घेवून जनावरांची वाहतूक केल्यास, सर्वांचा त्रास कमी होईल आणि गैरप्रकाराला आळा बसेल.
- डॉ. भारत राठोड,
जिल्हा पशू विकास अधिकारी जिल्हा परिषद