शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यास सशर्त परवानगी
By admin | Published: September 2, 2016 02:04 AM2016-09-02T02:04:01+5:302016-09-02T02:04:01+5:30
शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याकरिता दोन आठवड्यांत समिती नेमण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने गणेश विसर्जनाच्या
मुंबई : शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याकरिता दोन आठवड्यांत समिती नेमण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने गणेश विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी शिवाजी पार्कवर वाहने पार्क करण्याची परवानगी दिली. मात्र, शिवाजी पार्कवर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही उच्च न्यायालयाने संबंधितांना घेण्यास सांगितले आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. या नोटीस आॅफ मोशनवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.
९ सप्टेंबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शिवाजी पार्कवर पार्किंग करण्याऐवजी अन्य जागा शोधण्याचा आदेश दिला होता. जागा शोधण्यासाठी सरकारला एक समिती स्थापन करण्याचाही आदेश दिला होता. मात्र, पाच वर्षे सरकारने या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने, बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत समिती नेमा अन्यथा शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यास परवानगी देणार नाही, अशी तंबी राज्य सरकारला दिली.
त्यानुसार, गुरुवारी सरकारने दोन आठवड्यांत समिती नेमण्यात येईल, अशी हमी खंडपीठाला दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने गणेश विसर्जनाच्या वेळी शिवाजी पार्कवर पार्किंग करण्याची सशर्त परवानगी दिली. शिवाजी पार्क खराब झाल्यास अनंत चर्तुदशीनंतर एका आठवड्यात मैदान ‘जैसे-थे’ स्थितीत ठेवा, तसेच पार्किंगमुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही खबरदारी घ्या, असेही उच्च न्यायालयाने सरकारला बजावले. (प्रतिनिधी)